ट्रम्प-किम गाठभेटीने जागतिक बाजारभावना उंचावल्या..

सिंगापूर येथील जी-७ राष्ट्रांच्या बैठकीचे फलित म्हणून अमेरिका आणि उत्तर कोरियातील युद्धसदृश्य तणाव निवळल्याचे स्वागत भांडवली बाजारात मंगळवारी मोठय़ा तेजीसह झाले. सेन्सेक्स ३५,७०० तर निफ्टी १०,८५० नजीक पोहोचला.

प्रमुख निर्देशांकांचा सत्रअखेरचा बंद टप्पा १ फेब्रुवारीनंतरचा वरचा टप्पा ठरला. व्यवहारात मुंबई निर्देशांक ३५,७४३.०८ पर्यंत, तर निफ्टी १०,८५६.५५ पर्यंत झेपावला. सेन्सेक्स सत्रात २०९.०५ अंश वाढीसह ३५,६९२.५२ वर बंद झाला, तर ५५.९० अंश वाढीमुळे निफ्टी १०,८४२.८५ पर्यंत स्थिरावला.

कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्याच्या ऐतिहासिक करारावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख  किम जोंग उन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतील हे महत्त्वाचे फलित मानले जात आहे. त्याचे अपेक्षेप्रमाणे आशियाई तसेच युरोपीय बाजारांनी स्वागत केले. तोच परिणाम येथील प्रमुख निर्देशांकांवरही दिसून आला.

सायंकाळी जाहीर होणाऱ्या एप्रिलमधील औद्योगिक उत्पादन आणि मेमधील किरकोळ महागाई दरापूर्वी बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज्, स्टेट बँक, इंडसइंड बँक,  यूनिलिव्हर, हीरो, टीसीएस, सन फार्मा, कोटक महिंद्र बँक, विप्रो आदी ५.२३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर भारती एअरटेल, टाटा स्टील हे घसरणीच्या यादीत राहिले. आरोग्यनिगा, भांडवली वस्तू, सार्वजनिक उपक्रम, बँक, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, तेल व वायू आदी जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप अनुक्रमे ०.९० व ०.५४ टक्क्यापर्यंत वाढले.

‘डीमार्ट’ची १ लाख कोटी बाजारमूल्याला गवसणी

मंगळवारच्या व्यवहारात १ लाख कोटींचे बाजारमूल्य गाठण्याची कामगिरी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने (डीमार्ट) अखेर साध्य केली. मंगळवार सत्रअखेर कंपनीचा समभाग मुंबई शेअर बाजारात १,६०५.५० वर बंद झाला आणि बाजारमूल्य १,००,१९६.७६ कोटी रुपयांवर पोहोचले. २१ मार्च २०१७ मध्ये सूचिबद्धता झाल्यापासून त्याचे समभाग मूल्य १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.