|| सुधीर जोशी

आठवडय़ाच्या सुरुवातीला भांडवली बाजारावर इतर देशातील बाजारांप्रमाणेच अमेरिकी बाजारपेठेमधील मंदीच्या भाकितांचे सावट राहिले आणि चालू सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजार जवळपास एक टक्क्याने घसरला. परंतु दुसऱ्याच दिवशी सर्व घसरण भरून निघाली. पुन्हा बुधवारी आलेली मंदीची झुळुक अल्पायुषीच ठरली व उर्वरित दिवशी तेजीची दौड कायम राखत आठवडा अखेर मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात ५०८ तर निफ्टीमध्ये १६७ अंकांची वाढ झाली.

स्टेट बँकेने जेट एअरवेजवर मिळवलेल्या वर्चस्वाने सर्वाना दिलासा दिला; मात्र त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी बँकांची ताकद उद्योगघटकांना दिसली. अर्थातच हा रिझव्‍‌र्ह बँकेने थकीत कर्जांची वेळीच दखल घेऊ न उद्योगांना सावरण्यासाठी तयार केलेल्या नियमावलीचा परिणाम आहे. सदर नियमावलीमुळे कर्जाचा हप्ता चुकला तर सहा महिन्यात बँकेला उद्योगाला सावरण्यासाठी हालचाल करावी लागते व त्यानंतरच दिवाळखोरीसंबंधी कारवाई करता येते.

बँक ऑफ बडोदामध्ये ५,०४२ कोटींचे भाग भांडवल गुंतवण्याच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाचे बाजाराने स्वागत केले. विजया बँक व देना बँकेच्या अधिग्रहणानंतर बँक ऑफ बडोदाचे स्थान भारतीय बँकांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. बँक ऑफ बडोदाचा गेल्या पाच वर्षांतील बाजारमूल्याचा घसरणारा आलेख उंचावण्याची सुरुवात होऊ  शकेल.

महिंद्र आणि महिंद्रने वाहनांच्या किमतीत अर्धा ते २.७ टक्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने सादर केलेल्या एक्सयूव्ही ३०० या कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील वाहनासाठी पहिल्याच महिन्यात १३ हजारांची मागणी नोंदवली गेली आहे. या कंपनीचे गेल्या महिन्यात ट्रॅक्टर वगळता अन्य सर्व वाहनांच्या विक्रीचे आकडे वाढीचे होते. त्यामुळे या वर्षअखेरची कामगिरी वाढीव राहण्यास हरकत नाही.

पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षांपासून सरकारच्या अनेक नियमांची अंमलबजावणी होणार आहे. जसे नवीन बांधले जाणाऱ्या घरांवरील वस्तू व सेवा करातील कपात, समभागांच्या व्यवहारांसाठी डीमॅट खात्याची सक्ती, व्यापारी बँकांच्या कर्जावरील दरांची रेपो रेटबरोबरची सांगड, म्युच्युअल फंडांच्या खर्चावर २.२५ टक्यांची मर्यादा, घरगुती गॅसच्या किमतीतील संभाव्य वाढ, तरुण व मध्यम वयातील आयुर्विमाधारकांच्या हप्त्यामधील खर्चातील घट, बँक ऑफ बडोदामध्ये दोन अन्य सरकारी बँकांचे विलीनीकरण इत्यादी.

भांडवली बाजारावर या सर्वाच्या होणाऱ्या परिणामांचे आपण दर शनिवारी अवलोकन करीतच राहू. बाजाराचे लक्ष आता मार्च महिन्याच्या वाहन विक्रीचे आकडे, वस्तू व सेवा करवसुलीचे आकडे आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या संभाव्य व्याजदरकपातीचा निर्णय घेणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे असेल.