16 November 2019

News Flash

तेजीचा शिखर स्पर्श

सरकारी रोखे किंवा लिक्वि ड फंडदेखील उचित पर्याय ठरू शकतात.

|| सुधीर जोशी

आठवडय़ाच्या सुरुवातीलाच आर्थिक विकास दराने ५ वर्षांतील तळ व देशातील बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षांतील उच्चांक गाठल्याची आणि वाहनांच्या मे महिन्यातील विक्रीत सरासरी २० टक्यांची घट  झाल्याची आकडेवारी आली, तरी बाजाराने कशालाच जास्त महत्त्व दिले नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या इंधन तेलाच्या दरात लक्षणीय घट (ब्रेंट क्रुडचा दर प्रति िपप ७२ वरून ६१ डॉलर) झाल्यामुळे व रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) ४०,००० चा तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) १२,००० टप्पा पार केला. नंतरच्या दिवसात नफारुपी विक्री व रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणावर प्रतिकूल प्रतिक्रिया देऊन आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) ९९ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) ५२ अंशांची साप्ताहिक घट दाखवली.

नजीकच्या काळातील झी समुहावरील आर्थिक संकट, आयएल अँड एफएस घोटाळा व आता दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची कर्जरोख्यांवरील व्याज ठरल्यावेळी देण्याची असमर्थता यामुळे डेट फंडांची पतजोखीम (क्रेडिट रिस्क) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिवाण हाऊसिंगमध्ये गुंतवणूक असणाऱ्या काही स्थिर मुदतीच्या योजना (एफएमपी) व काही डेट म्युच्युअल फंडांचे नक्त मुल्य (एनेव्ही) एका दिवसात ६ ते ५३ टक्यांनी खाली आले आहे. बऱ्याच लहान गुंतवणूकदारांना (विशेषत: निवृत्त) भांडवलाची सुरक्षितता व समभागांतील गुंतवणुकीला पूरक म्हणून डेट फंडांमध्ये कमीत कमी ५०% रक्कम गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यामागे असलेलली जोखीमदेखील लक्षात ठेवली पाहिजे. यासाठी ७.७५ टक्के व्याज देणारे सरकारी रोखे किंवा लिक्वि ड फंडदेखील उचित पर्याय ठरू शकतात.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने महामार्ग बांधणीसाठी पुढील ५ वर्षांत १५ लाख कोटी खर्चाचे उद्दीष्ट ठेवले आहे व अडकलेले सर्व प्रकल्प १०० दिवसात मार्गी लावण्याचे ठरविले आहे. त्याचा लाभ बांधकाम क्षेत्रातील जे कुमार इन्फ्रा, नागार्जुन कन्स्ट्रक्शन्स, दिलिप बिल्डकॉन, अशोका बिल्डकॉन इत्यादी कंपन्या व अल्ट्राटेक सिमेंट,जेके लक्ष्मी सिमेंटसारख्या कंपन्यांना होऊ शकतो.

कच्या इंधन तेलाच्या दरातील घट इंडियन ऑईल, एचपीसीएल, बीपीसीएल या तेलशुध्दीकरण व विपणन क्षेत्रातील कंपन्यांच्या फायद्याची आहे. सध्या त्यांचे बाजारमुल्य खुपच कमी आहे आणि निवडणूका संपल्यामुळे इंधन दरावरील स्वायत्तता त्यांना परत मिळाली आहे.

सरकारच्या सुरुवातीच्या काळातील ग्रामीण व लघु उद्योगांवरील भर देणाऱ्या धोरणांमुळे व पावसाच्या समाधानकारक अंदाजांमुळे उद्योगांना चालना मिळेल. त्यात सहभागी होण्यासाठी मिड कॅप व स्मॉल कॅप फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून शिरकाव करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. कारण या फंडांचे नक्त मुल्य (एनएव्ही) सध्या अतिशय निम्न स्तरावर आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणाची संदिग्धता संपल्यावर आता बाजाराचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे राहील.

First Published on June 8, 2019 1:16 am

Web Title: bse nse nifty sensex 120