भांडवली बाजारातील सलग दोन सत्रांतील तेजीप्रक्रिया गुरुवारीही कायम राहिली. गुरुवारी शतकी निर्देशांक वाढ नोंदवीत सेन्सेक्स गुरुवारी २७,२५० नजीक पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने अखेर ८,४०० चा टप्पा गाठला.

१०६.७५ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,२४७.१६ वर पोहोचला. तर २६.५५ अंश वाढीमुळे निफ्टी ८,४०७.२० पर्यंत स्थिरावला. सेन्सेक्सने गेल्या सलग तीन सत्रांत ५२०.६१ अंश वाढ नोंदविली आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांक १० नोव्हेंबरनंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.

दोन व्यवहारातील वाढीनंतर सेन्सेक्सची गुरुवारची सुरुवात २७,१७१.६६ या तेजीसह झाली. सत्रात मुंबई निर्देशांक २७,२७८.९३ पर्यंत झेपावला.

बुधवारप्रमाणेच बँक क्षेत्राने मुंबई शेअर बाजारातील तेजीला गुरुवारीही साथ दिली. त्याला जोड माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची मिळाली. इंडसइंडने वाढीव नफा नोंदविल्यानंतर बँक समभागांचे मूल्य बुधवारी वाढले होते. तर गुरुवारी टीसीएसच्या वाढीव महसुली उत्पन्नामुळे एकूणच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली.

सेन्सेक्समध्ये मूल्य वाढलेल्या समभागांमध्ये पॉवर ग्रिड, एल अ‍ॅण्ड टी, आयसीआयसीआय बँक, सिप्ला यांचे मूल्य ४.१४ टक्क्यांपर्यंत वाढले. ल्युपिन, हिंदुस्थान यूनिलिव्हर, आयटीसी, कोल इंडिया, डॉ. रेड्डीज्, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र हे घसरणीच्या यादीत राहिले.

मुंबई शेअर बाजारात त्याचबरोबर भांडवली वस्तू निर्देशांकही तेजीत राहिला. तर औषधनिर्माण, वाहन, स्थावर मालमत्ता क्षेत्रावर विक्रीचा दबाव राहिला. ऊर्जा, भांडवली वस्तू निर्देशांक ३.१९ टक्क्यांपर्यंत वाढले. बँक निर्देशांक गुरुवारी नफेखोरीमुळे घसरणीच्या यादीत राहिला.