तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

गेल्या आठवडय़ात निर्देशांकाचा उच्चांक हा सेन्सेक्सबाबतीत ३०,२९९ आणि निफ्टीसाठी ९,४३७ असा होता. आठवडय़ात निफ्टीवर बुधवापर्यंत १०० अंशांची वाढ झाली व गुरुवारी एकाच दिवसात १०० अंशांची घसरण झाली. शुक्रवारच्या व्यवहारांअंतर्गतही निफ्टीवर ८० अंशांची चढउतार सुरू होती. तेव्हा निर्देशांकाची स्थितप्रज्ञता तेजीत रूपांतरित होईल की मंदीत याचा आपण आढावा घेऊ या.

पुढील आठवडा कसा?

शुक्रवारचा बंद भाव  :

सेन्सेक्स- ३०,४६४.९२,

निफ्टी- ९,४२७.९०

पुढील आठवडय़ात निर्देशांकावर ३०,३५० / ९,४५० ही ‘कलनिर्धारण’ पातळी असेल.  याच स्तरावर निर्देशांकाचे प्रथम उद्दिष्ट ३०,७०० / ९,५५० असेल व नंतर दुसरे उद्दिष्ट ३१,०००/ ९,६५० असे असेल. मात्र ३०,३५०/ ९,४५०च्या खाली निर्देशांक सातत्याने टिकल्यास, निर्देशांकांची ३०,०००/ ९,३५० आणि त्यानंतर २९,७००/ ९,२५० पातळ्यांपर्यंत घसरण दिसू शकते.

सोने विरुद्ध सेन्सेक्स द्वंद्व :

आज आपण सोने व भांडवली बाजार निर्देशांकाचा परस्पर संबंध समजून घेऊ या. भारतात पिवळ्या धातूला अनादिकालापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी जेव्हा गुंतवणुकीची साधनं उपलब्ध नव्हती तेव्हा बचतीचे, गुंतवणुकीचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटकाळी पसे उभारण्याचे माध्यम म्हणून सोन्याकडे बघितले जायचे. आजही जेव्हा जेव्हा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर संकटे, अनिश्चितता उद्भवते तेव्हा गुंतवणुकीसाठी सोन्याचाच विचार केला जातो. भारताच्या बाबतीत १९९० सालच्या आíथक पेचप्रसंगावर भारताने आपल्या सोन्याचा साठा ‘बँक ऑफ लंडन’कडे तारण ठेवून कर्ज उभारणी केली व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ)चे कर्जाचे हप्ते वेळेवर भरले गेले. त्यामुळे अनिश्चिततेच्या संकटात गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित माध्यमाकडे वळतात. त्यामुळे सोन्याच्या आलेखावर तेजी अवतरते. अनिश्चितता संपल्यावर जेव्हा उद्योगधंद्याचा विकास, वृद्धीला सुरुवात होते तेव्हा व्यापार उद्योगधंद्याच्या निगडित असलेला बाजार निर्देशांक वधारतो. तेव्हा सोने व निर्देशांकाचा परस्पर संबंध हा व्यस्त स्वरूपात असतो.

मागच्या दोन साप्ताहिक सदरात सोन्याच्या भावाला २७,९०० रुपयांचा भरभक्कम आधार आहे हे सांगितले गेले आहे. हा आधार सोन्याच्या भावाने टिकविल्यास सोने २८,५०० पर्यंत झेपावेल. हे इच्छित उद्दिष्ट गुरुवारी साध्य झाले. (गुरुवारचा भाव २८,७०० रुपये होता).

येणाऱ्या आठवडय़ात सोन्याच्या बाबतीत २८,५०० रुपये ही कलनिर्धारण पातळी असेल. २८,५००च्या वर २८,९०० ते २९,३०० रुपये पुढील इच्छित उद्दिष्टे असतील. अन्यथा २८,५००च्या खाली २८,२५० ते २८,००० पर्यंत सोने खाली येऊ शकते.  (सोन्याचे भाव एमसीएक्सवरील व्यवहाराचे आहेत.)