15 December 2017

News Flash

सेन्सेक्स, निफ्टी नव्याने शिखरावर

संभाव्य व्याजदर कपातीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: August 1, 2017 1:14 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई निर्देशांकात द्विशतकी अंश भर; संभाव्य व्याजदर कपातीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

दोन दिवसांनी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर कपात होईल या आशेवर गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभीच जोरदार समभाग खरेदी करत दोन्ही प्रमुख निर्देशांकांना त्यांचा नवा विक्रम नोंदविण्यास भाग पाडले. एकाच व्यवहारात सेन्सेक्सने २०० हून अधिक अंशांची भर नोंदविली. तर दिवसभर तेजीचे वातावरण राहिलेला निफ्टी १०,०७५ पुढे गेला.

व्यवहारात ३२,५३० पर्यंत मजल मारणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर २०५.०६ अंश वाढीने ३२,५१४.९४ वर पोहोचला. तर सत्रात १०,०८५ पर्यंत झेपावणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत ६२.६० अंश वाढीसह १०,०७७.१० पर्यंत गेला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये अध्र्या टक्क्य़ाहून अधिक वाढ नोंदली गेली.

मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारांनी गेल्या आठवडय़ात जुलै महिन्याची वायदापूर्तीच्या अखेरच्या टप्प्यात विक्रम नोंदविले होते. तर गेल्या शुक्रवारचे व्यवहार घसरणीने झाले होते. सेन्सेक्सचा यापूर्वीचा ३२,३८३.३० हा सर्वोच्च टप्पा २७ जुलै रोजी होता. तर निफ्टीने २७ जुलै रोजी १०,०२०.६५ अशी ऐतिहासिक नोंद केली होती. अवघ्या एक ते दोन सत्र व्यवहाराच्या अंतराने दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी त्यांचा आधीचा सर्वोच्च स्तर मागे टाकताना नवा विक्रम नोंदविला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवार, १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यंदाच्या बैठकीत व्याजदर कपातीची अटकळ आहे. विविध बँक तसेच अर्थतज्ज्ञ यांनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे बाजारात गुंतवणूकादारांचे मनोबल सप्ताहारंभीच्या व्यवहारातच उंचावले.

परिणामी बाजारात बँकांसह व्याजदराशी निगडित क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. रिझव्‍‌र्ह बँकेची संभाव्य व्याजदर कपात आणि स्टेट बँकेची मुदत ठेवींवरील व्याजदरातील कपात यामुळे बँकेचा समभागही बँक निर्देशांकांमध्ये आघाडी घेत ४.४६ टक्क्य़ांनी झेपावला.

कंपन्यांच्या तिमाही निकालावरील गुंतवणूकदारांची भिस्तही वाढली आहे. लार्सन अँड टुब्रोच्या वाढीव नफ्यामुळे कंपनीचा समभाग जवळपास ३ टक्क्य़ांपर्यंत वाढला. मुंबई शेअर बाजारात ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांकही सर्वाधिक, १.८६ टक्क्य़ांसह झेपावला.

First Published on August 1, 2017 1:14 am

Web Title: bse nse nifty sensex 33