15 January 2021

News Flash

तेजीची दौड कायम

‘सेन्सेक्स’मध्ये द्विशतकी भर; ‘निफ्टी’ ११,७०० पुढे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘सेन्सेक्स’मध्ये द्विशतकी भर; ‘निफ्टी’ ११,७०० पुढे

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक घडामोडी आणि जागतिक भांडवली बाजारातील तेजीने येथील प्रमुख निर्देशांकांनी सलग विक्रमी दौड कायम राखली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मंगळवारी ११,७००च्या पुढे गेला, तर सेन्सेक्सने ३८,९०० नजीक प्रवास राखला.

मंगळवारी २०२.५२ अंश वाढीसह सेन्सेक्स ३८,८९६.६३ या उच्चांकी टप्प्यावर पोहोचला, तर ४६.५५ अंश वाढीमुळे निफ्टी ११,७३८.५० अशा यापूर्वी न पाहिल्या गेलेल्या पातळीवर झेपावला. या तेजीमुळे दोन्ही निर्देशांकांनी त्यांचे सप्ताहारंभीचे सर्वोच्च टप्पे अवघ्या एका व्यवहारातच मागे टाकले.

अमेरिका व मेक्सिको दरम्यानच्या व्यापार सहकार्यानंतर आशियाई बाजाराने तेजी नोंदविली. तसेच युरोपीय भांडवली बाजारातही निर्देशांक वाढीचे वातावरण होते. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारानेही त्यावर अनुकूल प्रतिक्रिया दिली.

सोमवारच्या विक्रमानंतर मंगळवारच्या सत्राची सुरुवात तेजीसह करणाऱ्या सेन्सेक्सने व्यवहारात ३८,९०० पर्यंत मजल मारली, तर निफ्टी ११,७६०.२० पर्यंत झेपावला. दिवसअखेर दोन्ही निर्देशांकांनी सोमवारच्या तुलनेत अध्र्या टक्क्याची वाढ नोंदविली. त्याचबरोबर सेन्सेक्स व निफ्टी नव्याने विक्रमावर स्वार झाले.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स, एचडीएफसी, वेदांता, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स आदी सर्वाधिक मूल्यवाढीसह अग्रेसर राहिले. त्या उलट येस बँक, स्टेट बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, इंडसइंड बँक, बजाज ऑटो, विप्रो, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, सन फार्मा घसरणीच्या यादीत राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दोन टक्क्यांसह पोलाद निर्देशांक वाढला. ऊर्जा, वाहन, माहिती तंत्रज्ञान निर्देशांकही वाढले. सार्वजनिक उपक्रम, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, पायाभूत, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, आरोग्यनिगा, बँक निर्देशांकांवर विक्रीदबाव राहिला.

खतनिर्मिती कंपन्यांना साप्ताहिक रूपात अनुदान मिळण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मंगळवारअखेर ११ टक्क्यापर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप ०.३६ टक्क्याने तर मिड कॅपदेखील त्याच प्रमाणात वाढला. मुंबई शेअर बाजारातील १,१८८ समभागांचे मूल्य वाढले. तर १,५०८ समभाग घसरले.

तेजीला जोखीम पदरही!

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक दिवसागणिक विक्रम नोंदवीत असले तरी या तेजीला जोखमेचा पदरही असल्याचा इशारा अ‍ॅम्बिट कॅपिटल या दलाली पेढीने दिला आहे. उंचावलेले समभागांचे मूल्य हे खूपच ताणले गेले असल्याचे नमूद करीत एकूणच भांडवली बाजार हे अतिरिक्त मूल्यांकित क्षेत्र बनले असल्याचे तिच्या अहवालाने नमूद केले आहे.

तेजीच्या वातावरणातही भांडवली बाजारातील जोखमेकडे लक्ष वेधणाऱ्या अ‍ॅम्बिट कॅपिटलने पाच प्रमुख धोके हे गुंतवणुकीवर विपरीत परिणाम करू शकतील, असे म्हटले आहे. वित्तीय तसेच चालू खात्यातील तूट, सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात कमी होत असलेला बचत दराचा टक्का, नजीकच्या दिवसातील निवडणुकांचे निकाल तसेच भारत-पाकिस्तान दरम्यानचे आगामी संबंध हे ते जोखमीचे टप्पे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

अ‍ॅम्बिट कॅपिटलच् या या अहवालात, चालू आर्थिक वर्षांसाठी सकल राष्ट्रीय उत्पादन हा विशेष महत्त्वाचा मुद्दा राहणार नाही, असे म्हटले आहे. उलट निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सरकार अडथळे कसे दूर करते आणि विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे लक्ष द्यावे लागेल. या दलाली पेढीने चालू वित्तीय वर्षांचे सकल राष्ट्रीय उत्पादन ७ टक्के असेल, असे अंदाजले आहे. गेल्या वर्षांतील ५.८ टक्क्यांच्या तुलनेत तो अधिक असला तरी रिझव्‍‌र्ह बँक, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ७.४ टक्के या अंदाजापेक्षा तो कमी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2018 1:52 am

Web Title: bse nse nifty sensex 55
Next Stories
1 संसदीय समितीचा रिझव्‍‌र्ह बँकेवर ठपका
2 एअरटेलधारकांना मर्यादित मोफत नेटफ्लिक्स
3 सेन्सेक्स, निफ्टीत ‘जागतिक’ तेजी
Just Now!
X