देशी गुंतवणूकदार संस्थांकडून मात्र १,००० कोटी डॉलरचे बळ

निर्देशांक दिवसागणिक अनोखे टप्पे सर करीत असताना, भांडवली बाजाराला स्थानिक गुंतवणूकदार संस्थांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. २०१८ मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी येथील भांडवली बाजारात २८ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्या उलट स्थानिक गुंतवणूकदार संस्थांनी १,००० कोटी डॉलरचा निधी ओघ राखला आहे.

सेन्सेक्स तसेच निफ्टीने २०१८ मध्ये अनोखी तेजी नोंदविण्याबरोबरच निर्देशांकांचे नवे टप्पे गाठले आहेत. मॉर्निगस्टार या गुंतवणूक सल्लागार कंपनीने जाहीर केलेल्या अहवालानुसार, २०१८ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांच्या निधी निर्गमानाच्या तुलनेत स्थानिक गुंतवणूकदार संस्थांची येथील भांडवली बाजारातील गुंतवणूक रक्कम अधिक आहे.

२०१७ मध्ये भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ७७७ कोटी डॉलर काढून घेतले होते. तर गेल्या वर्षांत स्थानिक गुंतवणूकदारांनी १४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. भारतासह विकसित राष्ट्रांबद्दल सावधगिरीची भावना व्यक्त करत विदेशी गुंतवणूकदारांनी येथील भांडवली बाजारापासून काहीसे दूर राहण्याचे पसंत केल्याचे मॉर्निगस्टारच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चालू वर्षांच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी २२० कोटी डॉलरची मालमत्ता खरेदी केली. तर फेब्रुवारीमध्ये त्यांनी १८० कोटी डॉलची विक्री केली. मार्चमध्ये पुन्हा त्यांनी समभागांमध्ये गुंतवणूक करत १८० कोटी डॉलर ओतले.

एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ३०० कोटी डॉलरची समभाग विक्रीच्या माध्यमातून निर्गुतवणूक केली. मात्र जुलैमध्ये त्यांनी ३३ कोटी डॉलर आणि ऑगस्टमध्ये आतापर्यंत २४.२० कोटी डॉलरची गुंतवणूक केली.

स्थानिक गुंतवणूकदारांनी वर्षांची सुरुवात निधी काढून घेत केली. त्यांनी जानेवारीमध्ये ११ कोटी डॉलर बाजारातून काढून घेतले. तर फेब्रुवारीमध्ये समभागांमध्ये पुन्हा गुंतवणूक केली. हा कल ऑगस्टमध्ये, आतापर्यंत कायम राहिला.

परिणामी २०१८ मध्ये त्यांची समभागातील गुंतवणूक १,००० कोटी डॉलर नोंदली गेली आहे. सुरुवातीच्या कालावधीत अमेरिकेत रोख्यांवरील व्याज तसेच खनिज तेलाच्या किमती वाढत असल्याने विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय भांडवली बाजाराकडे अधिक कल राहिला. नव्या वित्त वर्षांचा प्रारंभ होताच हे चित्र मात्र बदलले, असे मॉर्निगस्टारचे व्यवस्थापक संशोधक हिमांशू श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.