ऑगस्टमध्ये ४.५३ टक्क्य़ांचा चार महिन्यांतील नीचांकी दर

पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा भडका झाला असतानाही, ऑगस्टमधील किरकोळ किंमत  निर्देशांकावर आधारीत महागाई दरापाठोपाठ घाऊक महागाई दरानेही दिलासा दिला आहे. प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमतीत उतार आल्याने गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ४.५३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या चार महिन्यांतील हा किमान दर आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेला हा दर आधीच्या, जुलैमधील ५.०९ टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे. तर वर्षभरापूर्वीच्या, ऑगस्ट २०१७ मधील ३.२४ टक्क्यांपेक्षा तो काहीसा अधिक आहे.

यंदा अन्नधान्याच्या किमतीत ४.०४ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदली गेली आहे. गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती २० टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर इंधन व ऊर्जा गटातील वस्तूतही दरउतार नोंदला गेला आहे.

गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर ३.६९ टक्के असा १० महिन्यांतील किमान स्तरावर नोंदला गेला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान किरकोळ महागाईचा ४.२ टक्के तर चालू वर्षांच्या उर्वरित अर्ध वित्त वर्षांत ४.८ टक्के अपेक्षित केला आहे.

महागाईचे ताजे दर आणि व्याजदर याबाबत भाष्य करताना इक्रा या वित्तसंस्थेच्या प्रधान अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी, रिझव्‍‌र्ह येणाऱ्या पतधोरणात व्याजदर वाढ करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रिझव्‍‌र्ह बँक तिचे चालू आर्थिक वर्षांतील चौथे द्वैमासिक पतधोरण येत्या ५ ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहे.