सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकांमध्ये तेजी; माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण कंपन्यांना मागणी

माहिती तंत्रज्ञान तसेच औषध निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकदारांकडून लाभलेल्या मागणीच्या जोरावर प्रमुख निर्देशांक गुरुवारी पुन्हा तेजीच्या दिशेने निघाले. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने यारूपात गेल्या सलग दोन सत्रातील घसरण मोडून काढली.

१४५.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,३०१.२७ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५३.३० अंश वाढीमुळे ८,७७८ वर स्थिरावला. मुंबई निर्देशांक गेल्या दोन व्यवहारात जवळपास २०० अंशांनी घसरला आहे. तर निफ्टीला गुरुवारच्या तेजीनंतरही ८,८०० चा टप्पा गाठता आला नाही.

कॅडिला हेल्थकेअरला अमेरिकी औषध नियामकाने प्रकल्पासाठी मंजुरी दिल्यानंतर एकूणच औषध निर्माण क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. तर येत्या बैठकीत समभाग खरेदीच्या प्रस्तावावर विचार करण्यात येईल या टीसीएसच्या स्पष्टीकरणानंतर अधिकतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांचे मूल्य उंचावले.

बुधवारी जाहीर झालेल्या जानेवारीतील निर्यात-आयातीचे समाधानकारक आकडे तसेच व्यवहारात परकी चलनाच्या तुलनेत वाढणाऱ्या रुपयाचेही गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात व्यवहार करताना स्वागत केले, असे निरिक्षण बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक (समभाग) कार्तिकराज लक्ष्मणन यांनी नोंदविले.

गेल्या सलग दोन व्यवहारातील घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराची गुरुवारच्या सत्राची सुरुवातच तेजीसह झाली. २८,२२३.८५ अशा वरच्या टप्प्यावर सकाळी विराजमान होणारा सेन्सेक्स सत्रात २८,३२७.८४ पर्यंत झेपावला. तर त्याचा सत्रातील तळ २८,१४६.१९ च्या पुढे राहिला. निफ्टीचा प्रवास गुरुवारी ८,७१९.६० ते ८,७८३.९५ असा वरचा राहिला.

पाच सहयोगी बँकांच्या विलिनीकरणाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या निर्णयानंतर गुरुवारी प्रमुख स्टेट बँकेचा समभागही वाढला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात टीसीएस, इन्फोसिस, विप्रो तर औषध निर्माण क्षेत्रात सन फार्मा, कॅडिला हेल्थकेअर यांचे समभाग तेजीच्या यादीत राहिले.

सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, गेल, महिंद्र अँड महिंद्रू आदीही राहिले.

untitled-10