22 February 2019

News Flash

जागतिक ‘बाजारझडी’चे लोण

सेन्सेक्सची ७६० अंशांनी घसरगुंडी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सेन्सेक्सची ७६० अंशांनी घसरगुंडी

अमेरिकेसह जगभरातील प्रमुख भांडवली बाजारांच्या पडझडीचे सावट म्हणून सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक गुरुवारी एकाच व्यवहारात तब्बल दोन टक्क्यांहून अधिक गडगडले.  डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या नव्या तळानेही निर्देशांकातील घसरणीत भर टाकली.

सकाळच्या सत्रातच बुधवारच्या तुलनेत तब्बल १,००० अंशांची आपटी नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने ३४ हजारांचा स्तरही सोडला होता. दिवसअखेरही तो ३४ हजारांच्या उंबरठय़ावरच राहिला. गुरुवारच्या व्यवहारअखेर ७५९.७४ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक ३४,००१.१५ वर स्थिरावला, तर २२५.४५ अंशांनी खाली येत निफ्टी १०,२३४.६५ पर्यंत थांबला.

बुधवारी ४५० अंशांहून अधिक तेजी नोंदविल्यानंतर मुंबई निर्देशांकाने गुरुवारच्या सत्राची सुरुवातच घसरणीसह केली. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स १,००० अंशांहून अधिक प्रमाणात खाली आला.

मुंबई निर्देशांक सत्रात ३३,७२३.५३ पर्यंत घसरला, तर व्यवहारातील त्याचा सर्वोच्च टप्पा ३४,३२५.०९ राहिला, तर निफ्टीचा या दरम्यानचा प्रवास १०,३३५.९५ ते १०,१३८.६० असा राहिला. दोन्ही प्रमुख निर्देशांक हे आता ११ एप्रिलनंतरच्या त्यांच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपले आहेत.

सेन्सेक्समधील घसरणीत स्टेट बँकेचा समभाग सर्वाधिक, ५.७४ टक्क्यांनी आपटला. तसेच टाटा स्टील, टीसीएस, वेदांता, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एचडीएफसी, इंडसइंड बँक, सन फार्मा, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो आदी घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद सर्वाधिक, ३.७७ टक्क्यांसह घसरणीत अग्रणी राहिला. माहिती तंत्रज्ञान, वाहन, स्थावर मालमत्ता, बँक, आरोग्य निगा, भांडवली वस्तू आदीही घसरले, तर मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक २.८१ टक्क्यांपर्यंत खाली आले.

विमान, तेल व वायू कंपन्यांना मागणी

सरकारने हवाई इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्याने तसेच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सावरल्याने बाजारात सूचिबद्ध अनुक्रमे नागरी हवाई कंपन्या (१५ टक्क्यांपर्यंत) व तेल व वायू कंपन्यांचे (३ टक्क्यांपर्यंत) समभाग वाढले. प्रमुख निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदवूनही संबंधित क्षेत्रातील समभागांना मात्र गुंतवणूकदारांकडून मागणी राहिली.

बुधवारी कमावलेले गुरुवारी गमावले..!

गुरुवारच्या पडझडीने दोन्ही निर्देशांक त्यांच्या गेल्या सहा महिन्यांच्या तळात विसावले आहेत. मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सच्या ४६१.४२ अंशवाढीमुळे बुधवारी कमावलेले ३ लाख कोटी रुपये गुरुवारी मात्र पाण्यात गेले. भांडवली बाजारातून पाय काढून घेण्याचे विदेशी गुंतवणूकदार संस्थांचे धोरण गुरुवारीही कायम राहिल्याने मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.६९ लाख कोटी रुपयांनी कमी होत १३५ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

नेमके काय झाले..?

जागतिक व्यापार युद्धाच्या गहन वळणाच्या चिंतेतून अमेरिकेच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी मोठी आपटी नोंदली गेली होती. तेथील डाऊ जोन्स, एस अँड पी ५००, नॅसडॅक, रसेल २००० आदी प्रमुख निर्देशांक एकाच व्यवहारात प्रत्येकी ३ टक्के घसरणीसह गेल्या आठ महिन्यांच्या तळात पोहोचले होते. त्याचबरोबर भारतातील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सकाळच्या सत्रातच ७४ पासून आणखी दुरावत ७४.४८ पर्यंत रोडावले. दिवसअखेर स्थानिक चलन बुधवारच्या तुलनेत ९ पैशांनी उंचावले असले तरी व्यवहारातील घसरणीने त्याने भांडवली बाजारातील चिंता अधिक वाढवली.

रुपया ७४.४८ पर्यंत रोडावला!

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण गुरुवारच्या व्यवहारात ७४च्या खाली जाताना ७४.४८ पर्यंत रोडावल्याची चिंता भांडवली बाजारात व्यक्त केली गेली. परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन गुरुवारअखेर बुधवारच्या तुलनेत ९ पैशांनी उंचावत ७४.१२ वर स्थिरावले.

सेन्सेक्सने व्यवहारात १,००० अंशांच्या आपटीने चिंता निर्माण केली तसेच रुपयाच्या सत्रातील ७४.५० नजीकच्या विक्रमी तळाने चलन मंचावर धास्ती निर्माण केली. अमेरिकेचा विकासदर आणि रोखे परताव्याबाबतची चिंता जागतिक महासत्तेतील प्रमुख निर्देशांकांवर बुधवारीच व्यक्त झाली होती.

तज्ज्ञांच्या नजरेतून घसरणीचे विश्लेषण

  • जागतिक बाजारातील घसरण ही भारतच नव्हे तर सर्वच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना हादरे देणारी असल्याचे मत जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केले. रोख्यांवरील वाढता परतावा दर आणि चलनातील घसरण यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी येथील बाजाराकडे पाठ केल्याचेही त्यांचे निरीक्षण आहे.
  • अमेरिकेसारख्या देशांतही गुंतवणूकदारांमधील अर्थचिंतेचे हे प्रतिबिंब असल्याचे टॉरस म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकप्रमुख धीरज सिंह यांनी नमूद केले. अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांच्या पडझडीने आशियाई बाजारातील अनेक बाजारांना कवेत घेतल्याचेही ते म्हणाले.
  • भांडवली बाजार तसेच स्थानिक चलनातील आपटी ही जागतिक घडामोडींमुळे नोंदली गेल्याचे केंद्रीय अर्थखात्याने म्हटले आहे. रुपयाच्या घसरणीबाबत, चालू खात्यातील तूट सावरण्यासाठी उपाय केले जातील, अशी त्यांनी ग्वाही दिली. अमेरिकेत बुधवारी घडलेल्या घटनेचा येथील भांडवली बाजारावर परिणाम नोंदला गेल्याचे नमूद करत अर्थखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक तसेच अमेरिकेच्या विकासवाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची प्रतिक्रिया भांडवली बाजारात उमटल्याचे सांगितले.

First Published on October 12, 2018 2:04 am

Web Title: bse nse nifty sensex 63