‘सेन्सेक्स’ची फेरउसळी १९ महिन्यांतील सर्वोत्तम ७३२ अंशांची झेप

सावरलेले जागतिक भांडवली बाजार, घसरलेल्या खनिज तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेतील रुपयाची भक्कमता यामुळे स्थानिक भांडवली बाजारात निर्देशांकांनी सप्ताहाची अखेर मोठय़ा वाढीसह केली. सलग तीन व्यवहारांत निर्देशांकांचे प्रचंड वर-खाली सुरू असलेल्या झोकांडय़ा बाजारात तेजीवाले आणि मंदीवाल्यांदरम्यान जोरदार हाणामारी सुरू असल्याचेही द्योतक आहे.

सेन्सेक्सची शुक्रवारच्या एका सत्रातील वाढ ही त्याच्या गेल्या १९ महिन्यांतील सर्वोत्तम झेपही ठरली आहे. आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन आणि महागाई दराची प्रतीक्षा करताना गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात नफेखोरीही साधली. तरीही दिवसअखेर सेन्सेक्स ७३२.४३ अंश उसळीसह ३४,७३३.५८ वर पोहोचला, तर २३७.८५ अंश वाढीने निफ्टीला १०,४७२.५० पर्यंत स्थिरावता आले.

भांडवली बाजार व्यवहारदरम्यान परकीय चलनविनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७४च्या वर उंचावले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ८० डॉलरखाली स्थिरावल्या. बाजार व्यवहारानंतर जाहीर होणाऱ्या ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादन दर व सप्टेंबरमधील महागाई दराची प्रतीक्षा करत गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी अवलंबिली.

साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीची कामगिरी गेल्या सहा आठवडय़ांच्या तुलनेत यंदा सर्वोत्तम राहिली. या दरम्यान मुंबई निर्देशांक ३६६.५९ अंशांनी, तर निफ्टी १५६.०५ अंशांनी वाढला आहे. तर प्रमुख निर्देशांकांचे शुक्रवारचे तेजी   २ टक्क्यांहून अधिक ठरली. शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्स ३४,८०८.४२ पर्यंत तर निफ्टी १०,४९२.४५ पर्यंत झेपावला.

सेन्सेक्समध्ये मारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, कोटक महिंद्र बँक, कोल इंडिया, इंडसइंड बँक, आयटीसी, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, ओएनजीसी, येस बँक, एचडीएफसी आदींचे मूल्य वाढले. तर मुंबई शेअर बाजारातील वाहन, स्थावर मालमत्ता, पोलाद, तेल व वायू, बँक, ऊर्जा, पायाभूत, माहिती तंत्रज्ञान, वाहन, भांडवली वस्तू आदी निर्देशांकातील समभागांना मागणी राहिली.

सप्टेंबरमधील वाढीव प्रवासी वाहन विक्रीच्या जोरावर या क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीत उत्सुकता दिसून आली, तर भांडवली बाजारातील सूचिबद्ध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांवर विक्री दबाव राहिला. गेल्या दोन व्यवहारांत लक्षणीय मूल्य हालचाल नोंदविणारे विशेषत: सरकारी तेल व वायू कंपन्यांचे तसेच खासगी नागरी हवाई वाहतूक कंपन्यांचे समभाग जवळपास ६ टक्क्यांपर्यंत झेपावले. मिड कॅप व स्मॉल कॅपही २.६३ टक्क्यांपर्यंत वाढले.