News Flash

निफ्टी निर्देशांक १०,०००चा स्तर राखेल काय?

पडझडीत निफ्टी निर्देशांक १०,०००चा स्तर राखेल काय?

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

सरलेल्या आठवडय़ात बुधवारी रात्री अमेरिकी बाजार आणि गुरुवारी आशियाई बाजारांचे – हँग सेंग, निक्केई हे निर्देशांक १,००० अंशांनी कोसळल्याने, गुरुवारी सकाळी बाजार उघडल्यावर, ज्याच्या त्याच्या लेखी एकच प्रश्न होता, या तीव्र पडझडीत निफ्टी निर्देशांक १०,०००चा स्तर राखेल काय?

परंतु शुक्रवारी बाजारात भरीव सुधारणा झाली आणि निफ्टी निर्देशांकाने साप्ताहिक बंद १०,०००च्या स्तरावर दिल्याने सर्वाना निश्चितच हायसे वाटले. अजूनही तेजीची आशा कायम आहे असा हा संकेत.. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स: ३४,७३३.५८
  • निफ्टी: १०,४७२.५०

येणाऱ्या दिवसांत आपण मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक अनुभवणार आहोत. या मध्यावधी तेजीचे लक्ष्य हे ३५,८००/ १०,८०० असे असेल. पण हे लक्ष्यही सहजासहजी गाठले जाणार नाही. या इतक्याशा वाटेतही घातक चढ-उतार अभिप्रेत आहेत ते पुढीलप्रमाणे-  येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक अनुक्रमे ३४,०००/ १०,२००चा आधार घेत, त्यांचे प्रथम लक्ष्य ३५,२००/ १०,५५० ते १०,६०० असे असेल. या स्तरावरून एक संक्षिप्त घसरण ही ३४,४००/ १०,३५० ते १०,४०० पर्यंत येऊन नंतर निर्देशांकांचे अंतिम लक्ष्य हे  ३५,८००/ १०,८०० असेल. निर्देशांकावर शाश्वत तेजी ही ३६,७००/ ११,०००च्या स्तरावरूनच येऊ शकेल.

सोन्याचा किंमत-वेध

भांडवली बाजार निर्देशांक आणि सोन्याचे संबंध हे व्यस्त स्वरूपाचे आणि कायम एकमेकांविरुद्ध असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गेल्या आठवडय़ाच्या पूर्वार्धात निर्देशांक गटांगळ्या  खात असताना सोने झळाळून उठून ३२,०००च्या पल्याड झेपावले. शुक्रवारी निर्देशांकात तेजी आल्याने सोन्याची चाल मंदावली. येणाऱ्या दिवसांत सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ३१,५०० ते रु. ३२,००० असेल. रु. ३२,०००च्या सकारात्मक वरच्या छेदाचे प्रथम उद्दिष्ट हे रु. ३२,३०० आणि नंतर ३२,६०० रुपये असेल. जोपर्यंत सोने ३०,८०० रुपयांचा स्तर राखून आहे तोवर सोन्यात तेजी कायम आहे हे गृहीत धरावे.(सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

स्टरलाईट टेक्नॉलॉजी लि.

  • (बीएसई कोड – ५३२३७४)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. ३१३.६५

दूरसंचार क्षेत्रातील संदेशवहनाच्या तारा अर्थात ऑप्टिकल फायबर केबल आणि दूरसंचार क्षेत्रातील माहिती-तंत्रज्ञान सेवा पुरविणारी ही आघाडीची कंपनी. स्टरलाईट टेक्नॉलॉजीच्या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. २७५ ते रु. ३१५ आहे. ३१५ रुपयांच्या स्तरावर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे ३४० ते ३५० रुपये असेल. त्यानंतर ३७५ रु. हे दुसरे उद्दिष्ट असेल आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे ४१५ रुपये असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला २५० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:08 am

Web Title: bse nse nifty sensex 65
Next Stories
1 इच्छापत्र: समज-गैरसमज २ आवश्यक ऐवज काय?
2 जादू याची पसरे मजवरी
3 गुंतवणुकीला शोभिवंत रंगसाज!
Just Now!
X