गैरबँकिंग वित्त समभागांवर दबाव; प्रमुख निर्देशांकात मोठी घसरण

भांडवली बाजारात  गैरबँकिंग वित्त कंपन्यांमधील रोकडतेबाबतची चिंता प्रमुख निर्देशांकांना सप्ताहअखेरच्या व्यवहारात मोठय़ा घसरणीकडे घेऊन गेली. घसरणीला माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्रातील समभागांनीही साथ दिल्याने निर्देशांकांवरील दबाव १.४३ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीला निमित्त ठरला.

सेन्सेक्स शुक्रवारच्या व्यवहारात तब्बल ४६३.९५ अंशांनी आपटत  ३४,३१५.६३ वर बंद झाला. तर १४९.५० अंश घसरणीसह निफ्टी १०,३०३.५० पर्यंत स्थिरावला.  कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचाही विपरीत परिणाम बाजारात नोंदला गेला.

दिवसभरातील गुंतवणूकदारांच्या समभाग विक्री धोरणामुळे सेन्सेक्स तसेच निफ्टीने अनुक्रमे ३४,४०० व १०,४०० चा स्तरही सोडला. रिलायन्स, एसीसी, माइंडट्रीसारख्या कंपन्यांच्या समभाग मूल्यांमध्ये आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात लक्षणीय हालचाल नोंदली गेली. या कंपन्यांनी वाढीव नफा नोंदवूनही समभाग मूल्यावर मात्र दबाव राहिला.

आयएल अँड एफएसमुळे गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या गैरबँकिंग वित्त कंपन्यांच्या रोकडेबाबतची चिंता भांडवली बाजारात उमटली. रिझव्‍‌र्ह बँकेने या कंपन्यांकरिता निधीओघ सुधारण्यासाठी पावले उचलूनही बाजारात सूचिबद्ध या क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्य मात्र जवळपास ५ टक्क्यांपर्यंत आपटले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती सावरल्या आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढले असले तरी अमेरिका-चीन व्यापार युद्धाची छाया बाजारात पुन्हा गडद झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत येत्या डिसेंबरमध्ये व्याजदर वाढीचे सावटही व्यवहारादरम्यान उमटले.

सेन्सेक्समधील घसरणीत येस बँक सर्वाधिक, ६.०६ टक्क्यांसह अग्रेसर राहिला. त्याचबरोबर एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, बजाज ऑटो, एशियन पेंट्स, ओएनजीसी आदीही घसरले. तर सन फार्मा, कोटक महिंद्र बँक भक्कम राहिले.

अमेरिकेच्या एच१-बी व्हिसा नियमांमध्ये अधिक कठोरता आल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिससारख्या कंपन्यांचे मूल्य खाली आले. तर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, दिवाण हाऊसिंग फायनान्स, आयएल अँड एफएस इंजिनीअरिंग अँड कन्स्ट्रक्शनचे मूल्य ३ टक्क्यांपर्यंत खाली आले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, वाहन, तेल व वायू, पायाभूत, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, आरोग्यनिगा, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, बँक, सार्वजनिक उपक्रम घसरले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप अनुक्रमे १.७२ व ०.२२ टक्क्यांनी घसरले.