सेन्सेक्समध्ये ७१८ अंश भर; निर्देशांक ३४,००० पुढे; निफ्टी १०,२५१ नजीक; निर्देशांकात २२१ अंश वाढ; गुंतवणूकदारांचा रिझव्‍‌र्ह बँकेला सशर्त पाठिंबा; बँक, वित्त कंपनी समभागांमध्ये उत्साही मूल्यवाढ

अर्थव्यवस्थेतील रोकडसमस्या दूर करण्याच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत येत्या महिन्यात केले जाणाऱ्या उपाययोजनांना भांडवली बाजाराने सोमवारी सशर्त पाठींबा दर्शविला. नव्या आठवडय़ाची सुरुवात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी तब्बल दोन टक्क्य़ांहून अधिक निर्देशांकझेपसह करताना सेन्सेक्स व निफ्टीला त्यांच्या वरच्या टप्प्यावर नेऊन ठेवले.

सप्ताहारंभीच्या सत्रातच सेन्सेक्स ७१८.०९ अंश वाढीसह ३४,०६७.४० पर्यंत झेपावला. तर निफ्टी एकाच व्यवहारात २२०.८५ अंश वाढीसह १०,२५०.८५ वर स्थिरावला. यामुळे प्रमुख निर्देशांकातील गेल्या सलग दोन व्यवहारातील घसरणही थांबली.

सेन्सेक्समध्ये तेजीबाबत अव्वल राहिलेल्या खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचा समभाग टक्केवारीबाबत दुहेरी अंकामध्ये वाढला. परिणामी बँकेचे गुंतवणूकदारही २०,००० कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. तर दोन्ही प्रमुख भांडवली बाजारातील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या यादीत स्थिरावले.

त्यातही सार्वजनिक उपक्रम, वाहन, माहिती तंत्रज्ञान, पोलाद, औषधनिर्माण क्षेत्रीय निर्देशांक अधिक वाढले. समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक आदी अग्रणी राहिले. अदानी पोर्ट्स, टाटा स्टील असे भिन्न क्षेत्रीय समभागही वाढले.

मुंबई शेअर बाजारातील छोटय़ा गुंतवणूकदारांच्या पसंतीचे स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक हे प्रमुख निर्देशांकांच्या जवळपास प्रमाणातच वाढले होते.

एकाच व्यवहारातील निर्देशांक वाढीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजारमूल्य सत्रअखेर शुक्रवारच्या तुलनेत ३.०८ लाख कोटी रुपयांनी वाढले. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती १ लाख कोटी रुपयांनी उंचावली.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या सप्ताहात ३ टक्क्य़ांची आपटी नोंदविली होती. यामुळे सेन्सेक्स ३४ हजाराच्या टप्प्यापासूनही ढळला होता. सोमवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभागांचे मूल्य वाढले. तर मुंबई शेअर बाजारातील १,८१५ समभागांना मागणी राहिली. मुंबई शेअर बाजारातील बाजारमूल्य दिवसअखेर १३६ लाख कोटी झाले.

निर्देशांकातील तेजीनिमित्त

  • सरकारी रोख्यांवरील वार्षिक व्याज सोमवारी वरच्या टप्प्याला पोहोचले. १० वर्षे सरकारी रोख्यांचा वार्षिक दर नवसप्ताहारंभी जवळपास एक टक्क्य़ाने वाढत वार्षिक ७.८० टक्क्य़ांच्या पुढे गेला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचा हा परिणाम होता.
  • रिझव्‍‌र्ह बँकेने नोव्हेंबरमध्ये अर्थव्यवस्थेत ४०,००० कोटी रुपये ओतण्याचे निश्चित केले आहे. मध्यवर्ती बँकेच्या खुल्या बाजारातील सरकारी रोखे खरेदीच्या पावलामुळे हे शक्य होणार आहे. यामार्फत अर्थव्यवस्थेल रोकडटंचाई दूर होईल.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुंतवणूकदारांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे. आशियासह युरोपीय भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी तेजीसह झाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील खनिज तेलाच्या किंमतीतील उताराचे बाजारात स्वागत होत आहे. सौदी अरेबियाच्या सुरळीत इंधन पुरवठय़ाचा हा परिणाम आहे. तुलनेत भक्कम होत असलेल्या डॉलरकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले आहे.
  • कंपन्यांच्या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचे स्वागत गुंतवणूकदारांकडून होत आहे. मुंबई शेअर बाजारातील विशेषत: बँक क्षेत्रातील समभागांमधील वाढ त्याचेच प्रतिबिंब आहे. ते १० टक्क्य़ांपर्यंत झेपावले आहेत.

यंदाची दिवाळी रोखे गुंतवणुकीची!

मला येत्या एक वर्षांत रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अनेक कारणांनी चांगला परतावा देईल, अशी आशा वाटते.

पहिले कारण, महागाईचा दर ४ टक्कय़ांच्या आसपास आहे. संसदेने कायदा करून रिझव्‍‌र्ह बँकेला महागाई ४ ते ६ टक्के दरम्यान राखण्याचे अधिकार दिले आहेत. द्विमाही पतधोरणात सलग दोन वेळा व्याज दरवाढ केल्यानंतर किरकोळ किंमतींवर आधारित सध्याचा महागाईचा दर महागाई पट्टय़ाच्या खालच्या पातळीवर असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने मागील पतधोरणात व्याजदरात बदल केला नाहीत. व्याजदरात वाढ केल्याच्या परिणामांची वाट पाहाण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा मानस आहे. दुसरे कारण, ऑक्टोबर – डिसेंबर २०१७ या तिमाहीत रोख्यांच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे आधीच अनुत्पादित कर्जापोटी करावयास लागलेल्या मोठय़ा तरतुदींनी जर्जर झालेल्या बँकांना रोख्याच्या किंमतींच्या घसरणीपोटी तरतूद करावी लागली. जानेवारीपासून रोखे गुंतवणुकीकडे पाठ फिरविलेल्या बँकांनी निवडक मुदतीच्या रोख्यांच्या खरेदींना नव्याने सुरवात केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने मागील महिन्यात ३० हजार कोटींची तर ऑक्टोबरमध्ये ४० हजार कोटींचे रोखे खुल्या बाजारातून खरेदी केल्यामुळे अर्थव्यवस्थेत पुरेशी रोकड सुलभता आहे. मागील १० वर्षांत केवळ ९५ टक्के वेळा केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचा परतावा ८ टक्कय़ांहून कमी होता आणि ५ टक्के वेळा ८ टक्कय़ांहून अधिक होता. ज्या वेळी हा दर ८ टक्कय़ांहून जास्त होता त्यावेळेला केलेल्या गुंतवणुकीवर तीन वर्षांत अधिक परतावा मिळाल्याचे वास्तव लक्षात घेता ३ वर्षांसाठी केलेली रोखे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक निश्चितच वाढीव परतावा देईल.