सेन्सेक्सची ३७३ अंश झेप; मुंबई निर्देशांक ३५,३५० पुढे

गेल्या सलग तीन व्यवहारातील घसरण मोडून काढताना नव्या आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकाने तेजी नोंदविली. ३७३.०६ अंश झेप घेत मुंबई निर्देशांकाने ३५,३५४.०८ पर्यंतचा टप्पा नोंदविला. १०१.८५ अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १०,६२८.६० वर पोहोचला.

दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये एकाच सत्रात एक टक्क्य़ाहून अधिक निर्देशांक वाढ राखली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या उतरत्या किमती तसेच व्यवहारातील डॉलरच्या तुलनेत भक्कम होणारा रुपया याचे स्वागत सप्ताहारंभीच्या सत्रात येथील भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी केले.

मुंबई निर्देशांकाने सोमवारच्या व्यवहारात ५०० अंशवाढीपर्यंतची उसळी घेतली होती. गैरबँकिंग वित्त कंपन्यांचा पतपुरवठा पूर्ववत होण्याच्या तसेच सरकारी बँकांमध्ये नवे भांडवल ओतण्याच्या घटनेने या दोन्ही क्षेत्राशी संबंधित समभागांमध्ये मागणी नोंदली गेली. तसेच वाहन क्षेत्रातील समभागही मूल्यतेजी नोंदविणारे ठरले.

सेन्सेक्समध्ये हीरो मोटोकॉर्प, हिंदुस्थान यूनिलिव्हर, विप्रो, एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, आयटीसी, भारती एअरटेल, टीसीएस, मारुती सुझुकी आदी तब्बल ५ टक्क्य़ांसह वाढले. येस बँक, ओएनजीसी, सन फार्मा, वेदांता, कोल इंडिया, टाटा स्टील, एनटीपीसी नफेखोरीमुळे जवळपास ४ टक्क्य़ांपर्यंत आपटले.

मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप मात्र ०.१५ टक्क्य़ासह खाली आला. तर मिड कॅप निर्देशांक स्थिर राहिला. आशियाई तसेच युरोपीय बाजारांमध्येही तेजी राहिली.

रुपया पुन्हा कमकुवत

मुंबई : गेल्या सलग सात व्यवहारात तब्बल २२० पैशांनी भक्कम होणारा रुपया सप्ताहारंभी त्याच्या घसरणीच्या प्रवासाकडे पुन्हा निघाला. येथील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य एकाच व्यवहारात १८ पैशांनी रोडावत ७०.८७ वर येऊन ठेपले. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती घसरत असल्याने अमेरिकी डॉलरला मागणी झाल्याने रुपयावर दबाव निर्माण झाला. नव्या सप्ताहाची सुरुवात ७०.४८ या वरच्या टप्प्यावर केल्यानंतर स्थानिक चलन ७०.३० पर्यंत झेपावले. मात्र सत्रअखेर त्यावर दबाव निर्माण झाल्याने गेल्या सप्ताहअखेरच्या, गुरुवारच्या ७०.६९ या टप्प्याच्या तुलनेत ते अधिक रोडावले. परकीय चलन विनिमय मंचावर शुक्रवारी गुरु नानक जयंतीनिमित्त व्यवहार बंद होते.

सोने-चांदी दरात घसरण

मुंबई : मुंबईच्या सराफा बाजारात सोने तसेच चांदीचे दर आठवडय़ाच्या पहिल्या व्यवहारात काहीसे घसरले. स्टॅण्डर्ड सोन्याचे दर एका तोळ्यासाठी ११५ रुपयांनी कमी होत ३०,८८५ रुपयांवर स्थिरावले. तर चांदीचा एक किलोचा दर गुरुवारच्या तुलनेत ३६५ रुपयांनी कमी होत ३६,४५० रुपयांवर स्थिरावला. येथील सराफा बाजारात गुरु नानक जयंतीनिमित्त व्यवहार बंद होते.