‘निफ्टी’कडून १०,८०० चा टप्पा; ‘सेन्सेक्स’ ३६ हजार पार

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील अर्थविकासाबाबतची उत्सुकता कायम असतानाच शुक्रवारी अर्थदिलासा देणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. यामध्ये भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांच्या तेजीसह त्यांच्या अनोख्या टप्प्यासह खनिज तेल व भारतीय रुपया यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

सलग चौथ्या व्यवहारात मोठी निर्देशांक भर नोंदविताना भांडवली बाजाराने गुरुवारी नवे वरचे टप्पे गाठले. एकाच व्यवहारात तब्बल ४५० अंशांनी झेपावताना सेन्सेक्स ३६,२०० नजीक पोहोचला. तर सव्वाशे अंश भर टाकत निफ्टी १०,८५० पुढे गेला. तर चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य गुरुवारच्या एकाच व्यवहारात तब्बल ७७ पैशांनी उंचावले. परिणामी, स्थानिक चलन ६९.८५ पर्यंत भक्कम बनले. रुपयाची ही गेल्या तीन महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी राहिली.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीतील उतार रुपयाच्या भक्कमतेच्या पथ्यावर पडला आहे. खनिज तेलाच्या किमती प्रति पिंपामागे ६० डॉलरच्या खाली विसावल्या आहेत. काळे सोन्याच्या किमती व्यवहारात एक टक्क्याने खाली आल्या आहेत. लंडनच्या बाजाराप्रमाणेच अमेरिकेतही खनिज तेलाच्या किमतीत उतार अनुभवला जात आहे.

खनिज तेलातील कमालीचा उतार हा भारतासारख्या देशाची चालू खात्यातील तूट तसेच महागाई कमी करण्यास प्रोत्साहित करणारा ठरू शकतो, असा आशावाद यानिमित्ताने अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

४५३.४६ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक ३६,१७०.४१ पर्यंत झेपावला. तर १२९.८५ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा प्रमुख निर्देशांक १०,८५८.७० पर्यंत स्थिरावला. नोव्हेंबरमधील वायदापूर्तीदेखील गेल्या तीन महिन्यांच्या सर्वोच्च टप्प्यावरील राहिली.

अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने गुंतवणूक तसेच अर्थव्यवस्थेबाबत आशादायक चित्र निर्माण केल्यानंतर त्याला येथील भांडवली बाजाराने साथ दिली. डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात जवळपास ७५ पैशांनी भक्कम बनल्याचे तसेच खनिज तेलाच्या किमती प्रतिपिंप ७० डॉलर खाली आल्याचेही गुंतवणूकदारांनी स्वागत केले.

सप्ताहअखेर जाहीर होणाऱ्या चालू वित्त वर्षांतील दुसऱ्या तिमाहीच्या अर्थविकासाच्या अंदाजाकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत याबाबतची स्पष्टता होईल. जी २० राष्ट्रांच्या बैठकीत जागतिक व्यापार तणाव शिथिल होण्याबाबतची आशाही बाजारात व्यक्त होत आहे.

सेन्सेक्समध्ये गुरुवारी बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक, महिंद्र अँड महिंद्र, वेदांता, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी लिमिटेड, आयटीसी, टाटा स्टील, टाटा मोटर्स आदी ५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर ओएनजीसी, पॉवरग्रिड, एनटीपीसी, इन्फोसिस, येस बँक, सन फार्मा यांच्यावर विक्री दबाव राहिला.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र ०.२३ टक्क्यांपर्यंत घसरते राहिले. महिन्याभरात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारात ९,००० कोटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे.

नोव्हेंबरच्या महिन्यातील वायदापूर्ती दरम्यान निफ्टी ७ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचा हा प्रवास १०,१०० पासून सुरू होत १०,९०० नजीक पोहोचला आहे.

दुसरीकडे रुपया सलग तिसऱ्या व्यवहारात वाढला आहे. ७०.१५ या वरच्या टप्प्यावर सुरुवात करणाऱ्या स्थानिक चलनाचा गुरुवारच्या सत्रातील प्रवास ६९.७८ पर्यंत झेपावला. यापूर्वी रुपयाचा ७० खालील बंदस्तर २४ ऑगस्ट रोजी नोंदला गेला होता. त्यावेळी स्थानिक चलन ६९.९१ वर होते.

यामुळे भांडवली बाजारातही महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या सत्रात अनोखी तेजी नोंदली गेली. तसेच प्रमुख निर्देशांकही वरच्या टप्प्यावर पोहोचले. चालू वर्षांच्या सुरुवातीला रुपयामध्ये १५ टक्क्यांपर्यंतची घसरण होती. मात्र वर्षांची अखेर भक्कम रुपयामध्ये परिवर्तित होताना दिसत आहे.

दिलासादायी अर्थप्रवर्तन..

  • खनिज तेल किमती पिंपामागे ६० डॉलरखाली
  • रुपया ७७ पैशांनी भक्कम होत प्रति डॉलर ७० खाली