17 July 2019

News Flash

जागतिक घडामोडीने पडझड

एकाच सत्रातील जवळपास ६०० अंश आपटीने सेन्सेक्स ३५,३००; तर निफ्टी १०,६०० वर

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एकाच सत्रातील जवळपास ६०० अंश आपटीने सेन्सेक्स ३५,३००; तर निफ्टी १०,६०० वर

अमेरिका-चीन दरम्यानचे व्यापार युद्धसावट, खनिज तेलाच्या उत्पादनातील कपातनिर्णय आदी जागतिक घडामोडींचे मोठय़ा स्वरूपातील पडसाद गुरुवारी येथील भांडवली बाजारावर उमटले. एकाच सत्रात सेन्सेक्स जवळपास ६०० अंशांनी आपटताना ३५,३०० वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील सत्रघसरण जवळपास २०० अंशांची राहिली. परिणामी निफ्टी निर्देशांक १०,६०० वर स्थिरावला.

या आंतरराष्ट्रीय घडामोडीसह चिनी दूरसंचार कंपनी हुआईच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला कॅनडात अटक करण्याच्या घटनेची तीव्र दखल जागतिक स्तरावरील निर्देशांकांसह भारतातील भांडवली बाजारातही घेतली गेली. येथील परकीय चलन विनिमय मंचावरील रुपयाची ७१ खालील घसरणही निर्देशांकांच्या घसरणीला कारणीभूत ठरली. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत होते. तर सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकातील घसरणीत अधिकतर समभाग सहभागी झाले.

तेल व वायू समभागांमध्ये मूल्यआपटी

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमालीने उतरल्याचे पडसाद गुरुवारी भांडवली बाजारातील संबंधित क्षेत्रातील कंपन्यांवर उमटले. बाजारात सूचिबद्ध तेल व वायू कंपन्यांचे मूल्य ३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. यामध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आदींचा समावेश राहिला. प्रमुख तेल उत्पादक देशांच्या गुरुवारच्या बैठकीकडे लक्ष ठेवत गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील समभागांची मोठय़ा संख्येने विक्री केली.

प्रमुख तेल उत्पादकांची गुरुवारी बैठक झाली. इंधनाचे हेलकावे खाणारे दर तसेच इंधनाचे उत्पादन याबाबत आगामी दिशा ठरविण्यासाठी झालेल्या या बैठकीत सौदी अरेबियासह काही तेल उत्पादक देश सहभागी झाले. कच्च्या तेलाच्या किंमतीतील स्थिरतेसाठी सौदीने इंधन उत्पादन कमी करण्याचा निर्णय या बैठकी दरम्यान घेतला.

रुपयाचीही आपटी

डॉलरच्या तुलनेत रुपयानेही गुरुवारी मोठी आपटी नोंदविली. येथील परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलनात एकाच सत्रात ४४ पैशांची घसरण होऊन रुपया ७०.९० वर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमध्ये प्रति पिंप ६० डॉलरखालील उताराचे सावट परकीय चलन विनिमय मंचावर उमटले. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांप्रमाणे रुपयतही गुरुवारी मोठी घसरण नोंदली गेली. गुरुवारच्या सत्राची ७०.८२ किमान स्तरावर सुरुवात करणारा रुपया व्यवहारात डॉलरपुढे ७१ च्याही खाली गेला. ७१.१४ पर्यंत गटांगळी खाल्यानंतर बुधवारच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरते राहिले. बुधवारी रुपया वधारला होता.

आगामी वर्षांत निफ्टी १३,००० पर्यंत!

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सकारात्मक कौल अर्थात केंद्रात स्थिर सरकार आल्यास, निफ्टी निर्देशांक उसळी घेऊन १३,००० ची पातळी गाठेल. अन्यथा खालच्या दिशेने १०,००० च्या खाली निर्देशांकाची घसरण दिसून येत नाही, असा निर्वाळा कोटक सिक्युरिटीजच्या संशोधन अहवालाने दिला आहे.

जागतिक स्तरावर, महासत्तांमधील व्यापारयुद्ध, अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हची संभाव्य व्याजदर वाढ आणि ब्रेग्झिटपश्चात परिस्थिती हे घटक जागतिक अर्थव्यवस्थेचा २०१९ तील कल निश्चित करतील, असे कोटक सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश राव यांनी संशोधन अहवालाचे निष्कर्ष पत्रकारांपुढे मांडताना गुरुवारी सांगितले. आगामी सहा महिने भांडवली बाजारासाठी खूप अस्थिर असतील, अर्थात संयमी गुंतवणूकदारांसाठी या काळात खरेदीच्या संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

मे २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा कौल हा बाजार कल निर्धारीत करणारा घटक असेल. सत्तांतरापेक्षा नव्याने येणारे सरकारच्या स्थिरतेचा मुद्दा अधिक परिणाम करणारा असेल. त्या विपरीत काही घडल्यास बाजारात घसरण होईल तथापि निफ्टी निर्देशांक १० हजाराच्या पातळीखाली जाणे असंभव असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. मिड आणि स्मॉल कॅप या बाजारवर्गात यापुढेही घसरण सुरूच राहील, असे राव यांनी स्पष्ट केले.

First Published on December 7, 2018 1:19 am

Web Title: bse nse nifty sensex 80