|| सुधीर जोशी

नववर्षांच्या पहिल्या आठवडय़ात घसरलेला शेअर बाजार या आठवडय़ात तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमुळे सावधपणे वर येऊ लागला आहे. महत्त्वाच्या कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांना सुरुवात झाली आहे. आठवडाभर रोज नव्याने अंदाज घेत कामकाजाच्या सत्रात बाजार मोठे चढ-उतार दाखवत होता. दिवसअखेर फार मोठी वाढ किंवा घट न दाखवता बाजार एका विशिष्ट पट्टय़ात मार्गक्रमण करीत होता. आठवडाअखेर मागील शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्सने ३१४ अंशांनी तर निफ्टीने ६७ अंशांनी भर घातली.

जाहीर झालेल्या निकालांपैकी इंडसइंड आणि बंधन बँकांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत. ‘आयएल अँड एफएस’ला दिलेल्या कर्जापोटी पुरेशी तरतूद करूनही निव्वळ नफ्यात अनुक्रमे ५ टक्के व १० टक्के वाढ झाली आहे. उर्वरित बँकांकडूनही असाच कल पाहायला मिळण्याची शक्यता वाटते. त्यातल्या त्यात स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेसारख्या ‘कॉर्पोरेट बँकां’कडून चांगल्या निकालांची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

या आठवडय़ात जाहीर झालेल्या बंधन बँकेच्या, गृह हाऊसिंग फायनान्स कंपनीबरोबरच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर बाजाराने काहीशी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. दोन्ही बँकांच्या बाजार मूल्यात अनुक्रमे दोन व तीन टक्के घट झाली; परंतु सरकारी धोरणात स्वस्त घरांवर दिलेला भर लक्षात घेता नवीन बँकेचे भविष्य उज्ज्वल आहे. याआधी स्टेट बँक समूहातील बँकांचे गेल्या वर्षी झालेले विलीनीकरण, या वर्षी होऊ घातलेले बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँकेचे विलीनीकरण या बँकिंग क्षेत्रातील उत्साहवर्धक घडामोडी बँकांच्या पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

आठवडय़ाच्या अखेरीस माहिती क्षेत्रातील बलाढय़ टीसीएस आणि इन्फोसिस यांनी अपेक्षेप्रमाणे समाधानकारक तिमाही निकाल जाहीर केले. जागतिक उद्योगांतील चढ-उताराचा या कंपन्यांवर अजून फारसा परिणाम जाणवलेला दिसत नाही. टीसीएस आणि इन्फोसिसच्या नफ्यात गेल्या तिमाहीच्या तुलनेत अनुक्रमे २.६ टक्के वाढ आणि १२ टक्के घट झाली. डिजिटल क्षेत्रामध्ये काही वर्षांपासून केलेल्या गुंतवणुकीचा दोन्ही कंपन्यांना आता फायदा होताना दिसत आहे. डिजिटल व्यवसायात ५० टक्के वाढ झाल्यामुळे एकंदर उत्पन्नातील वाढ कायम राखता आली आहे. या तिमाहीत डिजिटल उत्पन्नाचा एकूण उत्पन्नातील वाटा सुमारे ३० टक्के झाला आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या नेतृत्वबदलातून सावरलेल्या इन्फोसिसने ४ रुपये प्रति समभाग विशेष लाभांश आणि ८,२६० कोटींची समभाग पुनर्खरेदी जाहीर केली आहे. ही खरेदी प्रति समभाग ८०० रुपयांच्या दराने होणार आहे. निवडणुकीच्या आधीच्या अशाश्वत काळात टीसीएस (बंद भाव १,८४२ रु.) आणि इन्फोसिस (बंद भाव ६८४ रु.) मधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

बाजाराच्या पुढील आठवडय़ाचा कल शुक्रवारी जाहीर डी-मार्ट आणि पुढील आठवडय़ात जाहीर होणाऱ्या विप्रो, एल अँड टी इन्फोटेक, केपीआयटीसारख्या माहिती क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या निकालांवर ठरेल.

sudhirjoshi23@gmail.com