|| सुधीर जोशी

महत्वाच्या कंपन्यांच्या तिमाही निकालांकडे लक्ष ठेवून बाजाराने आठवडाभर सावध वाटचाल केली आणि अखेरच्या दिवशी रिलायन्सच्या निकालांवर सकारात्मक तर सन फार्माच्या सुशासनसंबिंधत बातमीवर तीव्र नापसंतीची प्रतिक्रिया नोंदविली. सेन्सेक्समध्ये आठवडय़ाभरात ३७६ अंशाची तर निफ्टीमध्ये ११२ अंशांची वाढ झाली.

मकरसंक्रांतीला सुरू झालेल्या कुंभमेळ्याला यावर्षी १३ कोटी भाविक/पर्यटक लोटणे अपेक्षित आहे. मोबाइल, हॉटेल, पर्यटन आणि एफएमसीजी कंपन्यांना कुंभमेळ्याची पर्वणीच आहे. कुंभमेळा संपतो नाही तोच जगातील सर्वाधिक मतदार असलेल्या निवडणुकांची लगबग देशभर सुरू होईल. सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या अनुनयाच्या योजना सरकार अंतरिम अर्थसंकल्पातून किंवा आधी जाहीर करेल. एकंदरीत ग्रामीण भारताची क्रयशक्ती वाढून उपरोक्त क्षेत्रातील हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, ब्रिटानिया, रिलायन्स जिओ इत्यादी कंपन्यांना जानेवारी ते जून हे सहा महिने वाढीव फायद्याचे ठरतील. हिंदुस्तान युनिलिव्हरने (बंद भाव रु. १७४४) जाहीर केलेल्या डिसेंबरअखेरच्या तिमाही निकालांत विक्रीमध्ये १०% आणि नफ्यात ९% वाढ दाखवली आहे. भविष्यातही तिची नफ्याची वाटचाल अशीच सुरू राहील.

रिलायन्स इंडस्ट्रीच्या तिमाही नफ्यात ७.७% वाढ होऊन तो १०,२५१ कोटी झाला. एखाद्या खाजगी कंपनीचा तिमाही नफा १०,००० कोटीवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स जिओच्या नफ्यातही १९% वाढ झाली आहे व ग्राहक संख्या २८ कोटींवर गेली आहे. नजीकच्या भविष्यात भारत जगातील सर्वात मोठा डिजिटल डेटाचा ग्राहक बनणार आहे. रिलायन्स (बंद भाव रु. ११८४) भावी काळातील व्यवसाय संधींसाठी तयार झाली आहे.

डी-मार्टच्या तिमाही निकालांनुसार २% घटलेल्या नफा प्रमाणावर बाजाराने नकारात्मक प्रतिक्रिया दिली. सोमवारी समभाग ११% ने खाली आला. परंतु डी-मार्टचे व्यापारी धोरणच कमी नफ्यातून ग्राहक आकर्षित करण्याचे असल्यामुळे या कंपनीचे मूल्यमापन निव्वळ उत्पन्न व नफ्यात झालेल्या अनुक्रमे ३३% व २% वाढीकडे पाहून केले जाऊ नये. १ फेब्रुवारीपासून परदेशी ई-व्यापार कंपन्यांवर सरकारने जाहीर केलेले र्निबध डी-मार्टच्या (बंद भाव रु. १३८३) पथ्यावर पडतील.

आतापर्यंत जाहीर झालेल्या लहान बँकांचे (इंडसइंड, डीसीबी, बंधन, फेडरल) तिमाही निकाल उत्साहवर्धक आहेत. तशाच निकालांची अपेक्षा मोठय़ा बँकांकडून ठेवता येईल. मागील वर्षांत अनुत्पादित कर्जामुळे त्यांना तोटा सहन करावा लागला. अनुत्पादित कर्जापोटी करावी लागणारी तरतूद आता पूर्ण झाली असल्यामुळे व सरकारी बँकांना अतिरिक्त भागभांडवल मिळाल्यामुळे बँकांच्या नफ्यात वाढ होऊ न परिणामी निफ्टीच्या उत्सर्जनात किमान १२% वाढ दिसेल. कारण निफ्टी निर्देशांकात बँकांचा ३२% प्रभाव आहे. एकंदरीत भांडवली बाजारासाठी २०१९ हे वर्ष भरभराटीचे ठरेल. आता बाजाराचे लक्ष पुढील आठवडय़ात जाहीर होणाऱ्या एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, येस बँक, कोलगेट, आयटीसी, रेमंड, पिडीलाइट, हेवेल्स, मारुती सुझुकी, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट इत्यादी कंपन्यांच्या निकालांकडे असेल.