|| सुधीर जोशी

जागतिक बाजारातील अनिश्चितता, येऊ घातलेल्या निवडणुकांबाबतची उत्सुकता आणि अर्थव्यवस्था वाढीबद्दलचे उलट-सुलट अंदाज यांचे सावट भारतीय बाजारावर असल्याने भांडवली बाजार काहीशा संभ्रमित अवस्थेत मार्गक्रमण करीत राहिला. विविध कंपन्यांच्या निकालांवर दररोज प्रतिक्रिया देत आठवडय़ाभरात सेन्सेक्सने ३६१ अंशांची तर निफ्टीने १२७ अंशांची घट नोंदविली.

समभाग पुनर्खरेदीला सेबीने परवानगी नाकारल्यावर लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) च्या व्यवस्थापनाने भागधारकांच्या फायद्याचे नवीन मार्ग शोधण्याचे ठरविले. सन फार्मा व्यवस्थापनाने अनेक उपाययोजना जाहीर केल्या जेणे करून गुंतवणूकदारांच्या मनातील कंपनी सुशासनांसंबंधी घेतल्या गेलेल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. या दोन्हींचे बाजाराने स्वागत केले. येस बँकेच्या नव्या मुख्याधिकाऱ्याच्या नावाबाबतचा निर्णय झाल्याबरोबर इतके दिवस गटांगळ्या खाणारा बँकेचा समभाग अखेर तेजी दाखवू लागला. प्रक्रियात्मक शिस्त (Process Orientation) पाळणाऱ्या डॉएश बँकेच्या रणवीत सिंग गिलना येस बँकेचे कुटुंबाधिष्ठित व्यवस्थापन सांभाळणे आव्हानात्मक असेल.

टाटा मोटर्सच्या बहुप्रतीक्षित ‘हॅरिअर’ या एसयूव्ही श्रेणीतील वाहनाचे बुधवारी अनावरण झाले. आक्रमक व भारदस्त दिसणाऱ्या या वाहनाची किंमतही स्पर्धात्मक आहे. इंडिकानंतर टाटा मोटर्स कंपनी प्रवासी कार विकण्यात अनेकदा अपयशी ठरली. गेली ३ वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक गुंटर बुशटेक यांनी टाटा मोटर्सच्या व्यवस्थापन आणि व्यवसाय धोरणात आमूलाग्र बदल करून प्रवासी वाहन क्षेत्रावर कंपनीचे लक्ष पुन्हा एकदा केंद्रित केले. पुढील १२ महिन्यांत १२ नवीन वाहने सादर करण्याच्या धडाडीच्या योजनेचे हे पहिले पाऊ ल आहे. गेली अनेक वर्षे भारतीय बाजारपेठेमध्ये तोटय़ात असणाऱ्या टाटा मोटर्सच्या दृष्टीने ‘हॅरिअर’ यशस्वी होणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील आणखी दोन तिमाहींचे निकाल व कंपनीच्या वाहन विक्रीचे मासिक आकडे पाहून मगच खरेदीचा विचार करावा.

मारुती सुझुकीने व्हॅगनआर कारची सुधारित आवृत्ती सादर केली. डिसेंबरच्या तिमाहीत मारुतीचा नफा १७% ने कमी झाल्याच्या घोषणेवर शुक्रवारी मारुतीचा समभाग ७.५%ने घसरला. गेल्या काही महिन्यात घसरलेल्या वाहन विक्रीला, स्थिर झालेले इंधनाचे व रुपयाचे दर आणि येऊ घातलेल्या निवडणुकांचा दिलासा मिळू शकतो. मारुतीचा बाजारपेठेत असलेला ५०% वाटा व मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या वाहनांची लोकप्रियता पाहाता मारुती सुझुकी (बंद भाव रु. ६,५१३) मध्ये गुंतवणूक करण्याची संधी ठरू शकते.

गेल्या आठवडय़ात म्हटल्याप्रमाणे, सामान्य जनतेच्या वाढीव क्रयशक्तीचा फायदा घेऊ  शकणाऱ्या ब्रिटानियाचा (बंद भाव रु. ३,२२१) निफ्टीमध्ये होणारा समावेश कंपनीच्या बाजारभावावर सकारात्मक परिणाम करेल.

बाजाराचे लक्ष आता शेवटच्या आठवडय़ातील बऱ्याच उर्वरित कंपन्यांच्या निकालांकडे आणि १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या या हंगामी अर्थसंकल्पाकडे राहील. निवडणुकीच्या तोंडावर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी, करमुक्त उत्पन्नात वाढ, शेतीमालाकरिता हमीभाव, शेतकऱ्यांना वाढीव पतपुरवठा इत्यादी योजनांचा समावेश होऊ शकतो. बाजार अशा बातम्यांवर दोलायमान राहील.

sudhirjoshi23@gmail.com