सीमेवरील वाढत्या तणावाने वादळी चढ-उतार

भारत-पाकिस्तानदरम्यान सीमेवरील हवाई हल्ला-प्रत्युत्तराचे पडसाद भांडवली बाजारातही बुधवारच्या व्यवहारावर उमटताना दिसून आले. प्रारंभी उसळी घेतलेल्या सेन्सेक्स निर्देशांकाने दिवस सरतासरता नकारात्मक कल दाखविला आणि या दरम्यानच्या व्यवहारात त्याने तब्बल ६०० अंशांनी हेलकावा घेतला.

ताबा रेषेवर पाकिस्तानकडून हवाई हल्ले सुरू झाल्याचे वृत्त आल्यासरशी बुधवारी भांडवली बाजारात सर्व बाजूंनी विक्री सुरू झाली. परिणामी प्रारंभीच्या व्यवहारात निर्देशांकांनी केलेली कमाई संपूर्णपणे धुऊन निघाली आणि उच्चांक स्तरावरून सेन्सेक्सने ६३६ अंश खाली नीचांक गाठला. सेन्सेक्स दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत ६८.२८ अंश खाली ३५,९०५.४३ या पातळीवर स्थिरावला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २८.६५ अंशांच्या घसरणीसह १०,८०६.६५ वर बंद झाला. निफ्टी निर्देशांकानेही बुधवारच्या व्यवहारात १०,९३९.७० उच्चांकावरून अकस्मात मोठी माघार दर्शविली. सीमेवरील युद्धजन्य तणावाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सेन्सेक्समध्ये २४० अंशांची घसरण दिसून आली आहे.

भारतीय हवाई दलाकडून मंगळवारी पहाटे केल्या गेलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबत बुधवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात सकारात्मक वातावरण होते. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांना हेरून त्यावर अचूकपणे केल्या गेलेल्या या जरब बसविणाऱ्या हल्ल्याचा राजकीय परिणाम म्हणून येत्या लोकसभा निवडणुकांमधून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या फेरनिवडीच्या शक्यता वाढल्याचे गृहीत धरून बाजारात खरेदीला जोर चढलेला दिसून आला. परंतु पाकिस्तानी हवाई दलाकडून प्रत्युत्तर आणि भारतीय वैमानिक ताब्यात घेतल्याच्या वृत्ताने हा उत्साह अल्पजीवी ठरला आणि बाजाराचा मूड पालटून त्याने घसरणीचे रूप धारण केले. भारताची दोन लढाऊ जेट विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला असून, आपला वैमानिक बेपत्ता आहे असे भारताने स्पष्ट केले.

युद्धजन्य तणाव कायम राहिला तर आगामी काही दिवस बाजारासाठी अस्थिर राहतील, असा विश्लेषकांचा कयास आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या परिणामी भांडवली बाजारातून गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केल्यास, घसरणीचे प्रमाणही विस्तारू शकेल, असाही विश्लेषकांचा इशारा आहे. सध्या तरी जागतिक स्तरावर भारतीय बाजाराला गुंतवणुकीला सर्वोत्तम प्राधान्य या गुंतवणूकदार वर्गाकडून मिळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सेन्सेक्समधील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण टाटा मोटर्स आणि वेदान्त यांनी नोंदविली. त्या उलट भारती एअरटेल, बजाज ऑटो, लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, टीसीएस, महिंद्र, मारुती या समभागांनी वाढ नोंदविली.

तीन बँकांमध्ये दमदार मूल्यवृद्धी

रिझव्‍‌र्ह बँकेने कर्ज वितरणावरील र्निबधांतून मुक्तता दिलेल्या धनलक्ष्मी बँक, अलाहाबाद बँक आणि कॉर्पोरेशन बँक या तीन बँकांच्या समभागांनी बुधवारच्या पडझडीतही मोठी मागणी मिळविली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या त्वरित सुधार कृती आराखडय़ांतर्गत अथवा ‘पीसीए’अन्वये र्निबधातून असलेल्या अलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक आणि धनलक्ष्मी बँक या बँकांना मोकळीक देण्यात आल्याचे मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले होते. त्याचे पडसाद म्हणून बुधवारी धनलक्ष्मी बँकेचा समभाग १० टक्क्य़ांनी वधारला, अलाहाबाद बँक समभाग ७.५३ टक्के तर कॉर्पोरेशन बँकेचा समभाग बुधवारच्या व्यवहारात ५.८२ टक्क्य़ांनी वधारला. नव्याने मुक्त झालेल्या तीन बँकांपैकी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांना केंद्र सरकारने मोठे भांडवली साहाय्यही उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे गेले काही महिने पडझड सोसत असलेल्या या बँकांच्या समभागांबाबत बाजारात सकारात्मकता असून, मागणीही लक्षणीय वाढली आहे.