सेन्सेक्स, निफ्टीत सलग तिसरी वाढ..

मंदीसदृश अर्थव्यवस्थेला सरकारने दिलेल्या अर्थसहाय्याच्या उपाययोजनांचे स्वागत भांडवली बाजारात सलग दुसऱ्या व्यवहारात गुंतवणूकदारांकडून कायम राहिले. एकाच व्यवहारात १४७.१५ अंश वाढीसह सेन्सेक्स ३७,६४१.२७ वर तर ४७.५० अंश वाढीने निफ्टी ११,१०५.३५ पर्यंत पोहोचला.

प्रमुख निर्देशांक आता गेल्या तीन आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर आहेत. सोमवारी ३७,५०० चा टप्पा ओलांडणाऱ्या सेन्सेक्सने मंगळवारच्या व्यवहारात ३७,७३१.५१ पर्यंत मजल मारली. तर निफ्टीची सत्रातील उडी ११,१४१.७५ पर्यंत राहिली.

भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांवरील, नवउद्यमींवरील कर रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी सरकारला अतिरिक्त निधी देण्याच्या पावलाने सेन्सेक्स, निफ्टीतील तेजी मंगळवारी आणखी उंचावली.

गेल्या सप्ताहाची अखेर करतानाही दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढले होते. मुंबई निर्देशांकात या तीन दिवसात १,१६८.३४ अंश वाढ तर निफ्टीत ३६४ अंश भर पडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरूनही आणि खनिज तेलाच्या किंमती पुन्हा काही प्रमाणात वाढूनही उलट अमेरिका-चीन व्यापार युद्ध शिथील होण्याबाबतची आशा बाजारात उमटली.

मुंबई शेअर बाजारात पोलाद, वाहन, तेल व वायू, उद्योग, भांडवली वस्तू, बहुपयोगी, ऊर्जा आदी क्षेत्रीय निर्देशांकांनी सेन्सेक्समधील वाढीला प्रोत्साहन दिले. प्रमुख निर्देशांकात टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी, इंडसइंड बँक, वेदांता, महिंद्र अँड महिंद्र आदी जवळपास ९ टक्क्यांपर्यंत वाढले. तर भारती एअरटेल, इन्फोसिस, टेक महिंद्र, टीसीएस, कोटक महिंद्र बँक, सन फार्मा, हिंदुस्थान यूनिलिव्हर, अ‍ॅक्सिस बँक आदी मात्र ३.६० टक्क्यांपर्यंत घसरले.

दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रीय निर्देशांक २.२६ टक्क्यांपर्यंत खाली आले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप १.६३ टक्क्यांपर्यंत वाढले.

रुपया ५४ पैशांनी मजबूत

सप्ताहारंभी अमेरिकी डॉलरपुढे ७२ पुढील किमान स्तर नोंदविणाऱ्या स्थानिक चलनात मंगळवारी तब्बल ५४ पैशांची भर पडली. गेल्या पाच महिन्यातील सर्वोत्तम सत्रझेप नोंदविताना रुपया आता आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत रुपया येथील परकीय चलन विनिमय मंचावर ७१.४८ वर स्थिरावला.