17 February 2020

News Flash

बाजार-साप्ताहिकी – सप्ताहाची अखेर आशावादी

बहुतेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र

|| सुधीर जोशी

या आठवडय़ात बाजार अर्थमंत्रालयाकडून परदेशी गुंतवणूकदारांसाठी तसेच स्थानिक गुंतवणूकदारांसाठी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर काही कर सवलत मिळण्याची अपेक्षा करीत होता. सध्या मंदीतून जाणाऱ्या काही उद्योगांनीदेखील सरकारकडून काही सवलतींच्या अपेक्षा ठेवल्या आहेत. सरकारच्या प्रमुख वित्तीय सल्लागारांनी अशा अपेक्षांवर पाणी फिरविले व उद्योगांनी स्वबळावर परिस्थितीचा सामना करण्याचे संकेत दिले. आधीच साशंक असणाऱ्या बाजाराने गुरुवारी यावर तीव्र प्रतिक्रिया देऊन नवीन नीचांक गाठला. मारुती सुझुकी तसेच पारले बिस्किटच्या प्रवर्तकांनी केलेले मंदीवरील भाष्य व त्यामुळे निर्माण होऊ शकणारा बेरोजगारीचा प्रश्न अशा बातम्यांमुळे गुंतवणूकदारांच्या मनात भयशंका वाढल्या आहेत. अर्थसंकल्पानंतर फक्त एका आठवडय़ाचा अपवाद वगळता बाजार प्रत्येक आठवडय़ात घसरत आहे. यंदाच्या आठवडाअखेरही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्स) ६४९ अंश, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) २१८ अंशांची पुन्हा एकदा साप्ताहिक घसरण दाखवली.

प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ आणि जिलेट या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जूनअखेर समाप्त झालेल्या वर्षांत अनुक्रमे १२ व १० टक्के वाढ जाहीर केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये  प्रवर्तकांचा हिस्सा ७० टक्क्यांहून जास्त आहे. मंदीच्या काळात असे समभाग आपल्या पोर्टफोलियोला उपकारक ठरतात.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन स्टेट बँक व अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या कर्ज ग्राहकांसाठी व्याज दर कमी करून येणाऱ्या सणासुदीच्या काळासाठी अनेक सुविधा देऊ केल्या आहेत. त्याचा परिणाम येणाऱ्या तीन महिन्यांत दिसेल. या बँका व आघाडीच्या दुचाकी वाहन कंपन्यांचे समभाग सध्याच्या पडत्या काळात घेऊन ठेवण्यासारखे आहेत.

आता बहुतेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे बाजाराला मोठय़ा हालचाली कारायला फारशी कारणे नाहीत. सर्वसाधारणपणे उद्योगांच्या नजीकच्या (एक वर्षांच्या) भवितव्याचे प्रतिबिंब बाजारात अगोदरच उमटलेले असते. त्यामुळे या पुढील सहा महिने कंपन्यांच्या कारभारात फारशी सुधारणा होणार नाही हे गृहीत धरूनच बाजाराने सध्याचा तळ गाठला आहे. बाजार बंद झाल्यावर होणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या घोषणेने शुक्रवारच्या उत्तरार्धाच्या सत्रात बाजारात पुन्हा आशा पल्लवित झाल्या व दिवसाअखेरीस निर्देशांक वर बंद झाले. बाजार बंद झाल्यावर अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुंतवणूकदारांच्या भांडवली नफ्यावरील कर अधिभार मागे घेऊन अर्थसंकल्पपूर्व परिस्थिती कायम ठेवण्याची अपेक्षित घोषणा केली. तसेच सरकारी बँकांना ७० हजार कोटींचा भांडवल पुरवठा ताबडतोब करणे, गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांची रोकडसुलभता वाढण्यासाठी नॅशनल हौसिंग बँकेने देऊ केलेल्या कर्जात ३० हजार कोटींपर्यंत वाढ व वाहन विक्री वाढण्यासाठी अनेक सवलती अशा महत्त्वाच्या घोषणा केल्या. बाजार याची दखल पुढील आठवडय़ात घेऊन गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवेल अशी अपेक्षा आहे.

sudhirjoshi23@gmail.com

First Published on August 24, 2019 2:00 am

Web Title: bse nse nifty sensex mpg 94 9
Next Stories
1 मंदीतील वाहन क्षेत्राला दिलासा
2 ‘आर्थिक उत्तेजन उद्योगांना नितीभ्रष्ट बनवेल’
3 सॅम्कोकडून अभिनव ‘स्मार्ट एसआयपी’ सेवा
Just Now!
X