पाच कंपन्या गुंतवणूकदारांचा कौल घेणार; ३१ हजारावरील सेन्सेक्स तारक ठरणार?

येता पंधरवडा हा सार्वजनिक आपले समभाग विक्री काढणाऱ्या किमान पाच कंपन्यांकडून भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांचा कौल आजमावणारा ठरेल. जून महिन्याच्या उर्वरित पंधरवडय़ात यामार्गाने तब्बल ५,५०० कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणार आहे.

पहिल्यांदाच गुंतवणूकदारांचा कौल घेणाऱ्या या कंपन्यांमध्ये दूरसंचार उपकरण निर्माती कंपनी तेजस नेटवर्क्‍स लि., देशातील दोन डिपॉझिटरी सेवांपैकी एक असलेली सेंट्रल डिपॉझिटरी सव्‍‌र्हिसेस लि. (सीडीएसएल), औषध निर्माणातील एरिस लाइफ सायन्सेस लि., लघू वित्त बँक असलेली एयू फायनान्शियर्स आणि जीपीटीएल हॅथवे लि. यांचा समावेश आहे.

बेंगळुरूस्थित तेजस नेटवर्क्‍सच्या भागविक्रीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. गोल्डमन सॅक्स, इंटेल कॅपिटल, फ्रंटलाइन स्ट्रॅटेजी, कॅस्केड कॅपिटल मॅनेजमेंट मॉरिशस आणि मेफिल्ड या सारख्या नामांकित गुंतवणूक संस्थांचे पाठबळ असलेल्या कंपनीत हे विद्यमान भागधारक आणि प्रवर्तक संजय नायक हे त्यांच्याकडील भांडवली हिस्सा आंशिकरित्या सौम्य करणार आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून लघू वित्त बँक (एसएफसी) म्हणून परवाना मिळविलेली तिसरी बँक म्हणून एयू स्मॉल फायनान्स बँक भांडवली बाजारात प्रवेश करीत आहे. यापूर्वी आलेल्या इक्विटास आणि उज्जीवन यांच्या भागविक्रीला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दर्शविला आहे. हे पाहता एयू स्मॉल फायनान्सही या भागविक्रीकडे मोठय़ा आशेने बघत आहे.

सीडीएसएलमध्ये तिचे चार प्रमुख भागीदार अर्थात बीएसई लि., स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि कोलकाता स्टॉक एक्सचेंज त्यांचा भांडवली हिस्सा आंशिकरूपात सौम्य करणार आहेत. सेबीने बीएसईला या उप कंपनीतील आपला हिस्सा विद्यमान ५० टक्कय़ावरून २४ टक्के कमी करण्याची मुभा दिली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सीडीएसएल, जीपीटीएल हॅथवे आणि एयू फायनान्शियर्सच्या भागविRी व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के हिस्सा राखीव आहे. त्यामुळे भागविक्रीसाठी अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष समभाग मिळण्याची शक्यता अधिक दिसून येते.

या उलट तेजस नेटवर्क्‍स व एरिस लाइफ सायन्सेसचा व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी राखीव हिस्सा केवळ १० टक्के आहे. चालू २०१७ सालात आजवर आठ कंपन्यांकडून ६,३३५.८३ कोटी रुपयांचे भांडवल भागविक्रीद्वारे उभारण्यात आले आहे. तुलनेत केवळ जूनच्या आगामी पंधरवडय़ात ५,५०० कोटींहून अधिक भांडवल उभारले जात आहे. गत वर्षी एकूण २६ कंपन्यांनी २६,४९३.८४ कोटी रुपये भागविक्रीच्या माध्यमातून प्राथमिक बाजारपेठेतून उभे केले आहेत.

untitled-9