घसरत्या घाऊक महागाई दराचे स्वागत; बँक समभागांना मागणी

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर पाच महिन्यांच्या तळात विसावल्याचे बुधवारी भांडवली बाजाराने स्वागत केले. बुडित कर्जवसुलीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडल्याने एकूणच बँक समभागांचे मूल्य वाढले.

५२.४२ अंशवाढीसह सेन्सेक्स ३१,१५५.९१ वर पोहोचला. तर ११.२५ अंश भर पडल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ९,६१८.१५ पर्यंत वाढला. मंगळवारी संमिश्र व्यवहार नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात सत्राच्या मध्यात घसरणीचा तळही गाठला गेला होता. मात्र दिवसअखेर तेजीसह झाली.

दिवाळखोर संहितेची अंमलबजावणी करण्याकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या मोठय़ा १२ बँक कर्जखात्यांविरुद्धच्या मोहिमेमुळे भांडवली बाजारातील सूचिबद्ध बँक समभागांना मागणी राहिली.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या सायंकाळी जाहीर होणाऱ्या पतधोरणाची प्रतिक्षा करताना गुंतवणूकदारांनी घसरलेल्या महागाई दराचे स्वागत केले. गेल्याच आठवडय़ात किरकोळ महागाई दरही ३ टक्क्य़ांखाली आला होता.

सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रिज, लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीज्, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग ३.३० टक्क्य़ांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक १.५० टक्क्य़ांसह उंचावला. तसेच भांडवली वस्तू, तेल व वायू, सार्वजनिक उपक्रम आदी निर्देशांकही तेजीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक ०.४६ टक्क्य़ांपर्यंत वाढले. मंगळवारी दिवसभरातील चढ-उताराच्या व्यवहारानंतर बाजाराने संमिश्र हालचाल नोंदविली होती.

untitled-8