03 March 2021

News Flash

‘सेन्सेक्स’ची सत्रात ३० हजाराला गवसणी

सकाळच्या सत्रातच सेन्सेक्सने वाढीसह ३०,००७.४८ ला गाठले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांकांची विक्रमी दौड सुरूच असून, बुधवारी पुन्हा एकदा ते सर्वोच्च उच्चांकावर विराजमान झाले. सत्रात अनोख्या अशा ३० हजाराला गाठणाऱ्या सेन्सेक्सने दिवसअखेर त्यापासून फारकत घेतली असली तरी सोमवारच्या तुलनेत ६४.०२ अंश वाढ नोंदवीत, २९,९७४.२४ हा सार्वकालिक टप्पा त्याने गाठला. तर २७.३० अंशवाढीसह निफ्टी ९,२६५.१५ वर पोहोचला.

मंगळवारच्या राम नवमीच्या सुटीनिमित्ताने भांडवली बाजारात व्यवहारात झाले नव्हते. सोमवारीही मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सर्वोच्च स्तरावर होता. बाजाराची बुधवारची सुरुवातही तेजीसहच झाली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या बुधवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या पतधोरणाच्या बैठकीकडे लक्ष असलेल्या गुंतवणूकदारांनी खरेदीचा क्रम कायम ठेवला. पतधोरण निर्णय गुरुवारी स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाबाबतच्या ठोस उपाययोजनांची प्रतीक्षाही आहेच.

सकाळच्या सत्रातच सेन्सेक्सने वाढीसह ३०,००७.४८ ला गाठले. दरम्यान, मुंबई निर्देशांक २९,८१७.६९ या सत्रातील तळापर्यंतही पोहोचला होता. मात्र दिवसअखेर पुन्हा त्यात वाढ होऊन ती सोमवारच्या तुलनेतही अधिक राहिली. या रूपात सेन्सेक्सने त्याचा  सोमवारचा, ३ एप्रिलचा २९,९१०.२२ हा टप्पाही मागे टाकला. गेल्या दोन दिवसांतील मुंबई निर्देशांकातील वाढ २८९.७२ अंशांची राहिली आहे.

सेन्सेक्ससह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही बुधवारी त्याचा स्थापनेतील सर्वोत्तम स्तर अनुभवला. व्यवहारात निफ्टी ९,२७३.९० पर्यंत झेपावला होता. त्यानेही सोमवारचा ९,२३७.८५ हा उच्चांक यामुळे मागे टाकला.

सेन्सेक्सने गेल्या तीन महिन्यांत दुहेरी अंकातील टक्के वाढ नोंदविली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरणाच्या चिंतेने मुंबई निर्देशांक २५,७५३.७४ या किमान स्तरावर होता. त्यानंतर त्यात बुधवारच्या विक्रमापर्यंत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

घसरत्या डॉलरने येथील भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर दबाव निर्माण झाला.

सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, ल्युपिन, स्टेट बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र आदी समभाग ३.१९ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, पोलाद, तेल व वायू निर्देशांक सर्वाधिक ४ टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील २०० हून अधिक समभागांनी त्यांचा वर्षभरातील उच्चांक नोंदविला. तर स्मॉल कॅप व मिड कॅप अनुक्रमे १.१२ व ०.४६ टक्क्यांनी वाढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 1:30 am

Web Title: bse nse nifty sensex part 2 2
Next Stories
1 रवांडा-भारत व्यापार तिपटीने विस्तारणार
2 मोदी सरकारचे महसुल यश
3 ‘आयपीओ’द्वारे ४० हजार कोटींची भांडवल उभारणी वर्षभरात अपेक्षित!
Just Now!
X