राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या ‘निफ्टी’मध्ये येत्या तीन वर्षांत वार्षिक दहा टक्के दराने वाढ होईल, अशी अपेक्षा आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचे समभाग गुंतवणुकीचे प्रमुख महेश पाटील यांनी व्यक्त केली.

आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाने आगामी वर्षांतील भांडवली बाजाराचा कल व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या आभासी पत्रकार परिषदेत पाटील यांनी भांडवली बाजाराबाबतचा पुढील वर्षांचा अंदाज व्यक्त केला.

नव्याने गुंतवणूक करण्यासाठी सध्याचे मूल्यांकन योग्य असल्याचे मत महेश पाटील यांनी व्यक्त केले. बाजाराचे सध्याचे मूल्यांकन अवाजवी असल्याचे मानणारा गुंतवणूकदारांचा एक समुदाय असला तरीही गेल्या वर्षी मार्चमध्ये विक्रीमुळे झालेल्या घसरणीनंतर नजीकच्या काळातील पुनव्र्याप्तीबद्दल चिंता व्यक्त केली होती. व्यापार चक्र जिथे दिशा बदलते त्या वेळी केलेल्या गुंतवणुकीवर सर्वाधिक नफा होण्याची शक्यता असते, असे ते म्हणाले. वाढलेली महागाई आणि निच्चांकी व्याजदरामुळे बचतीची क्रयशक्ती टिकविण्यासाठी समभाग गुंतवणुकीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२० पासून निफ्टी निर्देशांकात ४० टक्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या तेजीला चालना देणारी परकीय गुंतवणूक २०२१ मध्येही कायम राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. करोनामुळे झालेल्या अर्थव्यवस्थेच्या हानीच्या खुणा लवकरच नाहीशा होतील आणि भविष्यात या नुकसानीचा अंशही राहाणार नाही, असे मत आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचे सह मुख्य गुंतवणूक अधिकारी मनीष डांगी यांनी यावेळी व्यक्त केले.

डांगी म्हणाले की, चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था ५ टक्क्यांनी आकुंचित (उणे) होईल. मार्चमध्ये धातू आणि तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे आमचा गुंतवणुकीबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक होता. या दोन्ही जिन्नसांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आमचा या बाबतचा दृष्टिकोन बदलून तटस्थ आहे; परंतु या जिन्नसांच्या किमती स्थिर राहिल्याचा भारताला फायदा होईल.

ढोबळ आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२० अखेर म्युच्युअल फंड मालमत्ता २९.७१ लाख कोटी रुपये झाल्याचे गेल्या महिनाअखेर जाहीर करण्यात आले होते. तिमाही तुलनेत त्यात ७.६ टक्के वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले होते.