दोन दिवसांच्या घसरणीनंतर भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा विक्रमी टप्प्यावर विराजमान झाले. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवलही ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले.

डॉलरच्या तुलनेत भक्कम रुपया, विदेशी गुंतवणूकदारांचा निधीओघ तसेच टीसीएसच्या आगामी तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या जोरावर येथील भांडवली बाजारातील समभाग खरेदी सप्ताहअखेरच्या सत्रारंभापासूनच कायम राहिली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात, गुरुवारच्या तुलनेत ६८९.१९ अंश उसळीने ४८,७८२.५१ वर झेपावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २०९.९० अंश झेप घेत निर्देशांक १४,३४७.२५ पर्यंत उसळला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये जवळपास दीड टक्क्य़ापर्यंत वाढ नोंदली गेली.

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक मंगळवारी त्यांच्या विक्रमी स्तरावर होते. मात्र गेल्या सलग दोन्ही व्यवहारात त्यांनी घसरण अनुभवली. शुक्रवारी ती भरून काढताना सेन्सेक्स व निफ्टी मंगळवारच्या विक्रमी टप्प्याच्या आणखी पुढे गेले. सप्ताहअखेरच्या व्यवहारा दरम्यान सेन्सेक्स ४८,८५४.३४ पर्यंत तर निफ्टी १४,३६७.३० वर पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये मारुती सुझुकी जवळपास ६ टक्के वाढीसह अग्रणी राहिला. त्याचबरोबर टेक महिंद्र, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्र अँड महिंद्र, पॉवरग्रिड, एनटीपीसीही वाढले. तर इंडसइंड बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक, आयटीसी, एचडीएफसी लिमिटेड, बजाज फायनान्स १.३७ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, वाहन, बहुपयोगी वस्तू, तेल व वायू, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू आदी ३.५५ टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर पोलाद, दूरसंचार क्षेत्रीय निर्देशांकांवर विक्री दबाव राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्य़ापर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल शुक्रवारअखेर विक्रमी टप्प्यावर पोहोचले. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण समभागमूल्य १९५.६६ लाख कोटी रुपये झाले आहे. सप्ताहादरम्यान सेन्सेक्स ९१३.५३ अंशांनी तर निफ्टी ३२८.७५ अंशांनी वाढला आहे. सप्ताह तुलनेत टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे १.९० व २.३४ टक्के आहे.