स्थिर-अस्थिरतेच्या वातावरणात राहिलेल्या भांडवली बाजाराने सप्ताहाची अखेर तेजीसह नोंदविली. आघाडीच्या कंपनी समभागांना गुंतवणूकदारांकडून मागणी राहिल्याने सेन्सेक्स दिवसअखेर ८४.९८ अंश वाढीसह १९,४९५.८२ वर बंद झाला. तर निफ्टी ३०.९५ अंश वधारणेसह ५,८६७.९० पर्यंत पोहोचला. डॉलरच्या तुलनेत ६० च्या खाली गेलेल्या रुपयाला रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्या आश्वासनानंतर सावरल्याने सेन्सेक्सने गुरुवारी २३३ अंशांची वाढ नोंदविली होती. दिवसभरात निर्देशांकात तेजीच होती. असे करताना सेन्सेक्स १९,५०० पार होत १९,६१६.८९ या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला होता.
डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाने पुन्हा नरमाई अंगिकारली. आयातदारांनी अमेरिकन चलनाची मागणी नोंदविल्याने रुपया शुक्रवारी ९ पैशांनी घसरत ६०.२२ पर्यंत खाली आला. रुपयाने २६ जून रोजी ६०.७४ हा सार्वकालिक तळ गाठला आहे.