जागतिक शेअर बाजारातील उत्साहावर स्वार झालेल्या येथील भांडवली बाजारातील नफा कमाविण्याच्या हेतूने गुंतवणूकदारांनी बुधवारी लावलेल्या जोरदार विक्रीच्या सपाटय़ाने मुंबई निर्देशांकाने गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात मोठी आपटी नोंदविली. एकाच व्यवहारात तब्बल २५६ अंशांने खाली येत सेन्सेक्स २०,६३५ पर्यंत येऊन ठेपला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकाच व्यवहारात ८०.४५ अंशांने घसरत ६,१२२.९० वर स्थिरावला.
अमेरिका, चीनमधील अर्थसुधाराच्या जोरावर गेल्या काही दिवसांपासून एकूणच जागतिक भांडवली बाजारातील जवळपास आघाडय़ाच्या निर्देशांकांमध्ये चढे चित्र पाहायला मिळाले आहे. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्ससह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील बराच पुढे गेला होता. अशा वरच्या टप्प्यावरील कंपन्यांच्या समभागांचे मूल्य पदरात पाडून घेण्याच्या इराद्याने गुंतवणूकदारांनी बुधवारी अनेक बँकांसह रिलायन्स, इन्फोसिससारख्या आघाडय़ाच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्समधील २६ समभाग नुकसान सोसते झाले. तर १२ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये नकारात्मक स्थिती अनुभवली गेली. व्यवहाराची सुरुवातच नरम करणारा सेन्सेक्स दिवसभरात २०,५८० पर्यंत घसरला. व्यवहाराच्या अगदी शेवटच्या क्षणात ही स्थिती असताना सेन्सेक्सने दिवसअखेर फार काही सुधारणा नोंदविली नाही.
५ नोव्हेंबरनंतरची बाजाराची बुधवारची सर्वात मोठी घसरण नोंदली गेली. त्या वेळी सेन्सेक्स ६९६ अंशांने कोसळला होता.

रुपया पुन्हा कमकुवत
सलग पाच व्यवहारांत सलग वधारणारा रुपया बुधवारी प्रथमच डॉलरसमोर कमकुवत बनला. २१ पैशांच्या घसरणीसह रुपया डॉलरच्या तुलनेत ६२.५७ पर्यंत खाली आला. यामुळे गेल्या आठवडाभरातील त्यातील तेजी संपुष्टात आली. या दरम्यान चलन १३५ पैशांनी भक्कम बनले होते. बुधवारी रुपया ६२.२५वर खुला झाला असताना दिवसभरात तो ६२.२४ पर्यंत उंचावला; मात्र ६२.६८ पर्यंत घसरल्यानंतर त्यात अखेर नकारात्मक व्यवहारच नोंदले गेले. तेल कंपन्यांसारख्या आयातदारांकडून अमेरिकन चलनाची मागणी नव्याने नोंदली गेल्याने स्थानिक चलन अशक्त बनले.