नव्या सप्ताहाची सुरुवात करताना भांडवली बाजाराने घसरणीसह सुरुवात केली. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचा नवा हंगाम सुरू झाला असतानाच सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनातूनही फारसे काही निष्पन्न न होण्याच्या चिंतेने गुंतवणूकदारांनी विक्रीचे धोरण अवलंबिले. परिणामी, दोन्ही प्रमुख निर्देशांकांत किरकोळ घसरण झाली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३.१९ अंश घसरणीसह २८,४२०.१२ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.४० अंश घसरणीसह ८,६०३.४५ वर स्थिरावला.
आर्थिक सुधारणेला चालना देऊ पाहणारे वस्तू व सेवा कर तसेच जमीन हस्तांतरण विधेयक या अधिवेशनात येऊ घातले आहे. मात्र त्याच्या निर्धोक मान्यतेविषयी गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात व्यवहार करताना शंका उपस्थितीत केली. यामुळे गेल्या तीन व्यवहारांतील बाजाराची वाढ सोमवारी थोपली गेली. यापूर्वीच्या सलग तीन दिवसांच्या तेजीने मुंबई निर्देशांकाने ५३० अंशांची भर नोंदवीत तिमाहीतील वरचा टप्पा गाठला होता.
त्याचबरोबर येऊ घातलेल्या एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आदी आघाडीच्या कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांना त्याकडून फारशी अपेक्षा नाही, हे चित्र बाजारातील व्यवहारादरम्यान सोमवारी दिसले.