गेल्या आठ सत्रातील सलगची घसरण भांडवली बाजाराने सप्ताहारंभी मोडून काढली मात्र त्यातील वाढ अवघ्या १८.२४ अंशांचीच राहिली. सेन्सेक्स दिवसअखेर १९,१४१.६८ वर बंद झाला. निफ्टीत ७.५ अंश वाढ होऊन राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ५,६८५.४० पर्यंत पोहोचला.
भांडवली बाजाराने गेल्या सप्ताहात आणि तत्पूर्वी अशी सलग आठही सत्रात घसरण नोंदविली आहे. या कालावधीतील १,१३८.११ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स १९,२०० च्याही खाली आला. नव्या सप्ताहात मात्र सेन्सेक्स तेजीसह सुरू झाला आणि दिवसभरात १९,३०६.५१ अशा दिवसाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. पोलाद, बँक, माहिती तंत्रज्ञान समभागांना यावेळी मागणी राहिली. रुपयातील तेजीही निर्देशांकाच्या वाढीवर परिणामकारक ठरली.
ऐतिहासिक तळातून रुपया उंचावला
मुंबई : व्यवहारात त्याच्या ऐतिहासिक तळात पोहोचलेला डॉलरच्या तुलनेतील रुपया सोमवारी सावरला. शुक्रवारच्या तुलनेत त्याने २२ पैशांची वाढ नोंदवत ६०.८८ असा वरचा स्तर अखेर गाठला.
रुपयाने गेल्या शुक्रवारी ६१ चा टप्पा पार करतानाच ६०.१० असा नवा सार्वकालीक नीचांक नोंदविला होता. त्याची व्यवहारातील आतापर्यंतची विक्रमी घसरण ६१ च्या खाली, ६१.२१ अशी आहे. गेल्या दोन व्यवहारातही रुपया ७० पैशांनी कमकुवत बनला.
भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा येऊ लागल्याने त्यांच्यासह आयातदारांनीही परकी चलनाची मागणी नोंदविली. दिवसभरात रुपयाचा ६१.०२ ते ६०.७२ असा वरचा प्रवास राहिला.
‘एनएसईएल’ची तडजोडीसाठी अखेर समिती
रोकड टंचाईपोटी वस्तूंचे व्यवहार थांबविण्याची नामुष्की ओढावणाऱ्या ‘नॅशनल स्पॉट एक्स्चेन्ज लिमिटेड’ने (एनएसईएल) अखेर हे सारे निकाली निघण्यासाठी एका समितीच्या स्थापनेची घोषणा केली आहे. चार सदस्यांची ही समिती येत्या १४ ऑगस्टपर्यंत ५,६०० कोटी रुपयांचे वेतन अदा करण्याच्या दिशने प्रयत्न करेल, असे कंपनीचे अध्यक्ष जिग्नेश शहा यांनी सोमवारच्या तातडीच्या पत्रकार परिषदेत जाहिर केले. कंपनी कायदा मंडळाचे माजी अध्यक्ष शरद उपासनी हे समितीचे अध्यक्ष आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. आर.जे. कोचर, सेबीचे माजी अध्यक्ष जी. एन. बाजपेयी व महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक डी. शिवानंदन यांचाही समितीत समावेश आहे.