अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अर्थ समितीसमोर त्या देशाची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी बिकट अर्थस्थितीच्या बुधवारी सायंकाळी वाचलेल्या पाढय़ानंतर जगभरातील प्रमुख निर्देशांकातील आकडे मोठय़ा टक्केवारीसह पडझडीत परावर्तित झाले. अमेरिका, युरोप तसेच सकाळी लवकर उघडलेल्या आशियाई बाजारांची री ओडत भारतीय भांडवली बाजारांनीही गेल्या काही दिवसांत कमावलेली अनोखी पातळी गुरुवारी सोडली. ३९० अंश घसरणीसह सेन्सेक्स २० हजाराखाली तर १२५ अंशांच्या आपटीसह निफ्टी ६ हजाराखाली येऊन ठेपले. दोन्ही निर्देशांक दोन आठवडे पुन्हा माघारी जात तत्कालीन नीचांकाला येऊन दिवसअखेर विसावले. सलग चौथ्या सत्रातील या घसरणीने गुंतवणूकदारांची मालमत्ताही १.३७ लाख कोटी रुपयांनी कमी झाली.
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेतील अगतिकता तसेच चीनमधील सुमार औद्योगिक उत्पादन याची प्रतिक्रिया लगेचच विविध निर्देशांकांनी दिली. यातून मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारही सुटला नाही. भारतात राष्ट्रीयकृत स्टेट बँकेच्या गेल्या दोन वर्षांतील पहिल्याच तिमाहीतील घसरत्या नफ्याची साथ भांडवली बाजारांत पसरलेल्या निराशेला  मिळाली.
परिणामी सेन्सेक्स गुरुवारी ३८७.९१ अंश घसरणीमुळे १९,६७४.३३ वर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२७.४५ अंशाच्या नुकसानामुळे ५,९६७.०५ पर्यंत घसरला. दोन्ही प्रमुख निर्देशांक हे जवळपास दोन टक्के घसरणीसह गेल्या दोन आठवडय़ाच्या खालच्या पातळीवर बंद झाले.
जवळपास सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत होते. त्यातही बांधकाम, भांडवली वस्तू निर्देशांकांनी ३ ते ६ टक्क्यांच्या घसरणीसह आघाडी घेतली होती. स्टेट बँकेचा समभाग ८ टक्के तर रॅनबॅक्झीचाही ८.८ टक्के, रिलायन्सचा ४ टक्के तर इन्फोसिसचा एक टक्क्याने घसरला होता. तर सेन्सेक्समध्ये केवळ एचडीएफसी व सन फार्मा हे दोनच समभाग वधारले होते. तीही वाढ अध्र्या टक्क्यांचीच होती.
चालू आठवडय़ाच्या सुरुवातीपासून बाजारात नकारात्मक वातावरण कायम आहे. या तीन सत्रात तर मुंबई निर्देशांकातील घट २२४ अंशांची राहिली आहे. तर गुरुवारी घसरणीचे चार शतके मारणाऱ्या सेन्सेक्सची चार सत्रातील घट ६०० हून अधिक अंशांची नोंदली गेली आहे.
दरम्यान, भांडवली बाजारातील गुरुवारची मोठी घसरण आणि रुपयाने डॉलरच्या तुलनेत केलेला ५६ चा स्पर्श याबाबत सरकार पातळीवरून दिलासा देण्यात आला आहे. याबाबत गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे कारण नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री तसेच मुख्य आर्थिक सल्लागार यांनी स्पष्ट केले आहे.

जगभरातील निर्देशांक कोसळले!
फेडचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांच्या बुधवारच्या अमेरिके संसदेपुढील साक्षीबाबत मोठय़ा अपेक्षेने अमेरिकेतील शेअर बाजार काल मोठय़ा वाढीसह खुले झाले होते. मात्र बर्नान्के यांच्या काळजीच्या सूराने ते तसेच रोखे बाजारही कोसळले. अमेरिकेत बेरोजगारीचा दर ८ टक्क्यांच्या वरच राहून अर्थव्यवस्था त्वरित रुळावर येणार नसल्याच्या शक्यतेने फेडरल रिझव्र्हकडूनच रोखे खरेदी होऊ लागली. अमेरिकेबरोबरच सिंगापूर, चीन आदी देशातील निर्देशांक घसरू लागले. चीनमध्येही मे महिन्याच्या औद्योगिक उत्पादनात सात महिन्यात प्रथमच घट येणार असल्याची शक्यता एचएसबीसीने वर्तविल्यानंतर जपानच्या बाजारात प्रमुख शेअरचे भाव ६ टक्क्यांनी घसरले. तेथे एका दिवसात गेल्या पाच वर्षांतील मोठय़ा घसरणीची नोंद होताच मुदतीपूर्वीच व्यवहार बंद करण्यात आले.