उच्चांकी सूर मारत असलेल्या प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारअखेर मात्र उसंत घेणे पसंत केले. व्यवहाराच्या प्रारंभीच नवे शिखर गाठलेल्या आणि अगदी शेवटापर्यंत ते कायम ठेवणाऱ्या सेन्सेक्सने दिवसअखेर ६.४६ अंश घसरण राखत २२,७५८.३७ वर विराम घेतला. तर निफ्टीदेखील २.३० अंश घटीने ६,८१५.३५ पर्यंत खाली आला.
दोन्ही निर्देशांकांनी सोमवारी सप्ताहाची सुरुवात करताना विक्रमी दौड घेतली. या दिवशी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २१२.८५ कोटी रुपये बाजारात ओतले. मंगळवारी प्रारंभीच्या सत्रातही असाच धडाका कायम होता. लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान निम्मे उरकले असून, निकालाची प्रतीक्षा समीप येत असताना भांडवली बाजारातील विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांचा ओघ वाढत चालला आहे. परिणामी मंगळवारी सेन्सेक्सने व्यवहारात २२,८५३.०३ या सर्वोच्च शिखराला गवसणी, तर निफ्टीनेही ६,८३८ हा टप्पा प्रथमच गाठला.
दिवसअखेर मात्र गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, पोलाद, वाहन उत्पादक समभागांमध्ये विक्री करत नफेखोरीचे धोरण अनुसरले. सेन्सेक्समध्ये सेसा स्टरलाईट ४.०१ टक्क्यांनी तर विप्रो २.८ टक्क्यांनी घसरला. इन्फोसिस, स्टेट बँक, टाटा मोटर्समध्येही एका टक्क्यांपर्यंतची घट दिसली. तर रिलायन्स, एल अ‍ॅण्ट टी, एचडीएफसी बँक हे समभाग भाव खाऊन गेले. एप्रिल महिन्यातील वायदा व्यवहारांच्या सौदापूर्ती बुधवारी असून, परिणामी बाजार अस्थिर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे गुरुवारी भांडवली बाजारात व्यवहार होणार नसल्याने गुरुवारऐवजी उद्याच सौदापूर्ती होत आहे.