05 August 2020

News Flash

तेल धक्का व महागाईच्या भडक्यावर गव्हर्नरांची ग्वाही कामी आली

दोन दिवसांतील घसरणीसह २५,२०० च्या खालचा प्रवास करणाऱ्या आणि मंगळवारी दिवसभर सुस्तावलेल्या बाजाराने सेन्सेक्सने शेवटच्या तासाभरातील अकस्मात उसळीने दोन आठवडय़ांतील सर्वात मोठी झेप नोंदविली.

| June 18, 2014 01:03 am

दोन दिवसांतील घसरणीसह २५,२०० च्या खालचा प्रवास करणाऱ्या आणि मंगळवारी दिवसभर सुस्तावलेल्या बाजाराने सेन्सेक्सने शेवटच्या तासाभरातील अकस्मात उसळीने दोन आठवडय़ांतील सर्वात मोठी झेप नोंदविली. स्थिरावलेले चलन आणि कच्च्या तेलाचे नरमते दर पाहून फंडांनी तसेच बडय़ा गुंतवणूकदारांनी शेवटच्या तासाभरात आघाडीच्या समभागांची खरेदी केली. परिणामी सेन्सेक्स २५,५०० पुढे तर निफ्टी ७,६०० च्या वर गेला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेले कच्च्या तेलाचे दर आणि परकी चलन व्यासपीठावर सावरत असलेला रुपया यामुळे बाजारात समभागांची खरेदी नोंदली गेली. जागतिक घडामोडींचा सामना करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था सज्ज असल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दिलेला दिलासाही गुंतवणूकदारांना खरेदी करण्यास प्रोत्साहनपूरक ठरला.
३३०.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स २५,५२१.१९ तर ९८.१५ अंश वधारणेसह निफ्टी ७,६३१.७० पर्यंत गेला. प्रमुख निर्देशांकांची मंगळवारची झेप ही ६ जूननंतरची सर्वोत्तम ठरली. यावेळी सेन्सेक्समध्ये ३७६.९५ तर निफ्टीत १०९.३० अंश भर पडली होती. दोन्ही निर्देशांकांमध्ये जवळपास दीड टक्क्यांची वाढ राखली गेली.
सलग दोन दिवसांतील घसरणीनंतर वधारणेसह मंगळवारची सुरुवात करणारा सेन्सेक्स सकाळीच २५,५४५.८८ पर्यंत उंचावला. मध्यांतरात विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने दुपारनंतर बंदपूर्वी मुंबई निर्देशांकाने २५,१०४.५० चा व्यवहारातील तळही गाठला. मात्र व्यवहाराची अखेर मुंबई शेअर बाजाराने तेजीसहच नोंदविली.
गेल्या दोन व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचे ३८५.७३ अंशांनी नुकसान झाले आहे. आठवडय़ातील दुसऱ्या दिवशी सेन्सेक्समधील रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, भारतीय स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, कोल इंडिया, भेल, गेल इंडिया, मारुती सुझुकी या समभागांसाठी गुंंतवणूकदारांनी मागणी नोंदविली. सेन्सेक्समधील केवळ सहा समभाग घसरले. दुपापर्यंत काहीसे नरम राहिलेल्या बाजारात शेवटच्या क्षणी उत्साह संचारला. क्षेत्रीय निर्देशांकातील ११ निर्देशांकांमध्ये तेजी नोंदली गेली. त्यातही तेल व वायू, बँक, भांडवली वस्तू, ऊर्जा निर्देशांक आघाडीवर राहिले. किरकोळ गुंतवणूतकदारांकडून मागणी राहिल्याने मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही वधारले.
भांडवली बाजाराचे व्यवहार आता बुधवारच्या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीवर प्रतिक्रिया नोंदवतील. अमेरिकन अर्थव्यवस्था सावरत असल्याने किमान स्तरावरील व्याजदर कायम ठेवण्यासह आणखी मासिक १० अब्ज डॉलरचा वित्तसहकार्याचा हात यावेळी आखडता घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हे प्रमाण ४५ अब्ज डॉलरवर येईल.
पडझड थांबली तरी रुपयाची साठी कायम!
तीन व्यवहारात प्रथमच वधारताना भारतीय चलन मंगळवारी १३ पैशांनी उंचावले. मात्र सप्ताहारंभी ६० च्या खाली गेलेला रुपया अद्यापही ६०.०३ या स्तरावर आहे. मात्र मंगळवारच्या वधारणेने गेल्या सात आठवडय़ांतील नीचांकांतूनही रुपयाने डोके वर काढले. इराकमधील संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे विधान चलनाला दिवसाच्या ६०.६३ या तळातून बाहेर काढण्यास सहाय्यकारक ठरले. चलन यापूर्वी २९ एप्रिल रोजी ६०.५१ पर्यंत घसरले होते. बंदच्या वेळचा चलनाचा प्रवास हा त्याचा दिवसाचा उच्चांकी टप्पा ठरला. गेल्या सलग दोन व्यवहारातील चलनाचे नुकसान हे तब्बल ९१ पैशांचे राहिले होते.
तेजीच्या ‘बैला’ला महानायकाचे दंडवत!
सव्वाशे वर्ष जुन्या मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सकाळीच बिग बी अवतरला. एबी कॉर्प या चित्रपट निर्मिती कंपनीचा अध्यक्ष असलेला अमिताभ बच्चन कोणतीही कॉर्पोरेट घोषणा करण्यासाठी येथे आला नव्हता; तर आपल्या आगामी ‘युद्ध’ या चित्रपटाचे अनोखे ‘प्रमोशन’ त्याने पारंपरिक ‘बेल’ वाजवून केले. शेअर बाजार मुख्यालयासमोरील ‘बुल’शी दोन हात करण्याचा मोहही त्याला यावेळी आवरला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2014 1:03 am

Web Title: bse sensex flat as profit taking seen in some heavyweights infosys tcs shares rise
Next Stories
1 अन्नधान्याच्या किमतीत नरमाई आणता येईल: राजन
2 रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशाने राज्य सहकारी बँक अडचणीत
3 सेन्सेक्ससह निफ्टी १० दिवसाच्या तळाला!
Just Now!
X