स्थिर कररचना व अधिकतर वस्तूंची स्वस्ताई देणाऱ्या यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पाचे स्वागत भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी केले. १०७.१५ अंश वाढीने मंगळवारी सेन्सेक्स २०,६३४.२१ या गेल्या तीन आठवडय़ांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५३.८० अंश वधारणेसह ६,१२७.१० पर्यंत उंचावला. करातील सूट तसेच आर्थिक सहकार्य यामुळे भांडवली वस्तू, वाहन तसेच बँक क्षेत्रातील समभागांची कामगिरी मंगळवारीही उंचावली. गेल्या दोन व्यवहारात २७१ अंशांची वाढ राखणारा मुंबई निर्देशांक २०,६८५.०२ या वरच्या टप्प्यावर दिवसाची सुरुवात करता झाला. हाच त्याचा दिवसाचा उच्चांक ठरला. तर सत्राचा तळ २०,४३६.४८ होता.
सेन्सेक्स २० जानेवारीच्या २०,६४७.३० या आधीच्या उच्चांकानजीक पोहोचला आहे. तर गेल्या सलग तीन सत्रांतील मिळून त्यातील वाढ ही तब्बल ४४०.८६ अंश राहिली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, स्टेट बँक यांच्या समभाग मूल्यात तेजी नोंदली गेली. सेन्सेक्समधील २१ समभाग वधारले.
घसरलेल्या समभागांमध्ये गेल, आयटीसीसह भारती एअरटेलही सहभागी झाला. मुंबईतील लूप मोबाइल ताब्यात घेण्याच्या वृत्ताने भारती एअरटेलचा समभाग अवघ्या एक टक्क्याने घसरला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँकेक्स २.३४ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. पाठोपाठ भांडवली वस्तू (२.०९ टक्के), ऊर्जा (१.७३ टक्के), पोलाद (१.०३ टक्के), वाहन (०.९६ टक्के) यांचा क्रम राहिला.

रुपयाची तीन आठवडय़ांतील मोठी घसरण
डॉलरच्या तुलनेत ३६ पैशांनी घसरताना मंगळवारी भारतीय चलन ६२.२० या गेल्या तीन आठवडय़ांच्या सर्वात मोठय़ा घसरणीवर येऊन ठेपले. सप्ताहातील दुसऱ्या दिवशीचा परकीय चलन व्यवहारातील रुपयाचा प्रवास सुरुवातीपासूनच घसरता होता. व्यवहारात ६२.३१ पर्यंत घसरल्यानंतर रुपया दिवसअखेर ०.५८ टक्क्यांनी खाली आलाच. यापूर्वीच्या दोन व्यवहारातही रुपया ५८ पैशांनी घसरला होता. यापूर्वी २७ जानेवारी रोजी रुपयाने एकाच व्यवहारात सर्वात मोठी ४४ पैशांची आपटी अनुभवली होती.