विक्रमी अखेर; हिंदू नववर्षांचे स्वागत
ऐतिहासिक सेन्सेक्स शुभेच्छांसह!
वर्षभरात २० हजारांपर्यंत पोहोचण्यास प्रचंड आढेवेढे घेणारा आणि २१ हजारांचा विक्रमी टप्पा मात्र सहज गाठणाऱ्या सेन्सेक्सने मावळत्या हिंदूू वर्षांच्या अखेरच्या क्षणी मात्र साजेसी कामगिरी बजाविली. सलग तिसऱ्या सत्रात विक्रमी स्तर गाठणाऱ्या मुंबई निर्देशांकाने शुक्रवारी २१,१९६.८१ अशा न भूतो आकडा नोंदवत संवत २०६९ ला सहर्ष निरोप दिला.
व्याजदराशी निगडित बँक, वाहन, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीच्या जोरावर मुंबई निर्देशांकाने ३२.२९ अंश अशी भर घातली. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी २० व्या दिवशीही कायम राहिल्याने आणि भारतीय अर्थव्यवस्थेविषयी पुन्हा आशावाद उंचावल्याने सेन्सेक्समधील २० कंपन्यांचे समभाग उंचावले.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यानंतर गेल्या सलग चार व्यवहारांत सेन्सेक्सने वाढ राखली आहे. अमेरिकेमार्फत रोखे खरेदी तूर्त कायम ठेवण्याच्या धोरणाचे बाजाराने स्वागतच नोंदविले आहे. बँक समभागांची तर आगेकूच सुरू आहे.

रविवारी मुहूर्ताचे सौदे
नव्या २०७० संवत्साची सुरुवात रविवारच्या लक्ष्मीपूजनाने होत आहे. त्यानिमित्ताने मुंबई शेअर बाजारासह राष्ट्रीय शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे होणार आहेत. हिंदू नववर्ष संवत २०७० चा शुभारंभ म्हणून भांडवली बाजारात रविवारी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी मुहूर्ताचे व्यवहार होणार आहेत. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात हे व्यवहार सायंकाळी ६.१५ ते ७.३० असे पाऊण तास होणार आहेत.

व्यवहारातील उच्चांकही सर!
मुंबई शेअर बाजाराचा शुक्रवाच्या व्यवहारातील सर्वोच्च टप्पा २१,२९३.८८ राहिला. संवताचा व्यवहारातील अखेरचा दिवस, सप्ताहाचा शेवट आणि नव्या महिन्यातील पहिले सत्र असा सुर्वणत्रिकोण साधत सेन्सेक्सने शुक्रवारी १० जानेवारी २००८ रोजीचा व्यवहारातील २१,२०६.७७ या सर्वोच्च स्तरदेखील मागे टाकला.
ल्ल  आठवडय़ात षष्ठशतकी झेप
बुधवारपासून मुंबई निर्देशांकाचा विक्रमी टप्प्याकडे प्रवास सुरू आहे. तर सलग चार व्यवहारांत त्यात वाढ राखली गेली. यादरम्यान त्याची झेप ६२६.५३ अंश राहिली आहे. टक्केवारीत ही वाढ ३ टक्के आहे. आधीच्या संवत तुलनेत यंदा सेन्सेक्सने २,५२६.४७ अंश वाढ राखली.
ल्ल  ‘निफ्टी’ विक्रमापासून अद्याप दूर
निफ्टी शुक्रवारी तीन वर्षांनंतर ६,३००च्या पुढे गेला. ८.०५ अंश वाढ नोंदवीत त्याने ६,३०७.२० पर्यंत मजल मारली. विक्रमी टप्प्यापासून निफ्टी अद्यापही लांब आहे. यापूर्वी ८ जानेवारी २००८ रोजी त्याने व्यवहारातील ६,३५७.१० तर ५ नोव्हेंबर २०१० रोजी बंदअखेर ६,३१२.४५ असा सर्वोच्च टप्पा गाठला आहे.

‘सेन्सेक्स’ची दिवाळीशेअर बाजार हा भाव-भावनांचा खेळ, तर दिवाळी सण गुंतवणूकदारांसाठी खासच भावोत्कट! दिवाळीतील मुहूर्ताच्या सौद्यांचे दर्दी गुंतवणूकदारांसाठी मानाचे वेगळेपण. यंदाची दिवाळी तर ‘सेन्सेक्स’च्या २१ हजारी ऐतिहासिक उच्चांकी स्तराने साजरी होत आहे. मावळत्या संवत्सरात ‘सेन्सेक्स’ने १३.८% कमावले आहे.
गेल्या १२ वर्षांत लक्ष्मीपूजनाने सुरू होणाऱ्या मुहूर्ताला सेन्सेक्सचा आणि सोन्याचा किंमत स्तर आणि पुढील मुहूर्तापर्यंत त्यांचा प्रवास वाचकांसाठी उद्बोधक ठरेल.