आर्थिक सुधारणांचा नवा टप्पा ज्या घटकेपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे तो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सुरू होताच सोमवारी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारांना पुन्हा एकदा नव्या विक्रमाची सैर घडवून आणली. सलग ऐतिहासिक टप्पा नोंदविणारा सेन्सेक्स तर आता २८,५०० च्या उंबरठय़ावर, तर निफ्टीने ८,५०० ची वेसही ओलांडली आहे.
एकाच व्यवहारातील दीडशेहून अंश झेपेमुळे मुंबई शेअर बाजार प्रथमच २८,५०० नजीक पोहोचला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ८,५०० हा टप्पा पहिल्यांदाच अनुभवला आहे. सप्ताहारंभी सेन्सेक्स १६४.९१ अंश वाढीसह २८,४९९.५४ पर्यंत, तर निफ्टी अर्धशतकी, ५२.८० अंश वधारणेसह २८,५३०.१५ या नव्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला.
शुक्रवारी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी टप्प्यावर आपला प्रवास थांबविला होता. २८,४१३.०१ ने सुरुवात करणारा सेन्सेक्स सोमवारी व्यवहारात २८,५०० च्या पुढे जात २८,५४१.९६ पर्यंत गेला. दिवसअखेर तो २८,५०० च्या काठावर विसावला. शुक्रवारचा २८,३३४.६३ हा विक्रम मोडीत काढणाऱ्या सेन्सेक्सने गेल्या दोन व्यवहारांत ३०१.७८ अंशांची भर नोंदविली आहे.
सेन्सेक्सने यापूर्वीचा व्यवहारातील २८,३६०.६६ हा टप्पा खूपच मागे टाकला, तर निफ्टीने सोमवारच्या सत्रात ८,५३४.६५ हा सर्वोच्च स्तर पाहिला. शुक्रवारीच निफ्टीही ८,४८९.८० या सर्वोच्च टप्प्यावर होता.
८,५३०.१५ वर अखेर करण्यापूर्वी निफ्टीने शुक्रवारचा ८,४७७.३५ हा टप्पाही मोडीत काढला. शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १२२.५० कोटी रुपयांची खरेदी केली होती.
सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपनी समभागांचे मूल्य विक्रमी प्रवासात उंचावले. यामध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अ‍ॅण्ड मिहद्र, भेल, एचडीएफसी बँक, हिरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, टाटा पॉवर, टीसीएस, विप्रो यांचा समावेश राहिला. पोलाद क्षेत्रातील समभाग मूल्य वाढीबाबत अधिक चमकले. हा क्षेत्रीय निर्देशांकही सर्वाधिक १.८६ टक्के भाव खाऊन गेला.
माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, बँक आदी क्षेत्रीय निर्देशांकांनीही वधारणेला साथ दिली. निर्देशांकांनी सलग तिसऱ्या सत्रात तेजी नोंदविली आहे. तिन्ही सत्रांतील मिळून सेन्सेक्स वाढ ४६६.६९ अंश झाली आहे. तर येत्या गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत.
संसदेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सुधारणे संबंधातील अनेक निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. त्याच जोरावर गेल्या काही सलग सत्रांपासून भांडवली बाजारही तेजीसह विक्रमाच्या हिंदोळ्यावर आहे. सोमवारी तर त्यात चीनद्वारे व्याजदर कपातीचीही भर पडली. यामुळे तिकडे युरोपातील मध्यवर्ती बँकही आर्थिक उपाययोजना करण्याची चाहूलही गुंतवणूकदारांनी बाजारात व्यवहार करताना दुर्लक्षित केली नाही.

रुपयाची पुन्हा ६२ ची धास्ती
eco06परकी चलन व्यासपीठावर सप्ताहारंभी रुपयाने पुन्हा धास्ती निर्माण केली आहे. सलग दोन व्यवहारातील भक्कमतेसह गेल्या आठवडय़ाची अखेर करणारे स्थानिक चलन सोमवारी व्यवहारअखेर तब्बल १८ पैशांनी रोडावत पुन्हा एकदा ६२ नजीक, ६१.९४ पर्यंत पोहोचले. दोन सत्रांत २० पैशांची कमाई करणारा रुपया आता पुन्हा गुरुवारच्या समकक्ष येऊन ठेपला आहे.

मौल्यवान धातूंमध्ये संमिश्र वातावरण
मुंबईच्या सराफा बाजारात मात्र सोमवारी संमिश्र दर हालचाल नोंदविली गेली. स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा भाव २० रुपयांनी वधारत २६,४२५ रुपयांवर गेला. त्याचबरोबर शुद्ध सोन्याचा दरही याच वजनासाठी १५ रुपयांनी वधारून २६,५०० च्या पुढे, २६,५७० रुपयांपर्यंत पोहोचला. उलट चांदीचा किलोचा दर १३० रुपयांनी रोडावत २७,०३० रुपयांवर स्थिरावला.