नव्या आठवडय़ाची सुरुवात ऐतिहासिक टप्प्यासह करणाऱ्या भांडवली बाजाराला मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्पाने निरुत्साहित केले. एकाच व्यवहारात तब्बल ५०० हून अधिक अंशांची आपटी    नोंदवीत सेन्सेक्सने गेल्या १० महिन्यांतील सर्वात मोठी घसरण राखली. मुंबई निर्देशांक २६ हजारांखाली येतानाच निफ्टीनेही त्याचा ७,८००चा स्तर सोडला.
व्यवहारात २६,१९०.४४ पर्यंत पोहोचणाऱ्या सेन्सेक्सने दिवसअखेर ५१७.९७ अंश घसरण नोंदवीत थेट २५,५८२.११चा तळ गाठला. तर निफ्टीने सत्राच्या सुरुवातीलाच ७,८००चा स्पर्श केल्यानंतर अखेर १६३.९५ अंश घट नोंदवीत ७,६२३.२०पर्यंत जाणे पसंत केले. दोन्ही निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक आपटले.
दुपारी १२च्या सुमारास रेल्वे अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी भांडवली बाजाराचा प्रवास तेजीत होता. ऐतिहासिक उच्चांकासह नव्या सप्ताहाची नोंद करणाऱ्या सेन्सेक्सने मंगळवारच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नवा टप्पा गाठला. सेन्सेक्स या वेळी २६,२०० पर्यंत तर निफ्टीने ७,८०० ची वेस गाठली. दिवसअखेर मात्र दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सप्टेंबर २०१० नंतरची सर्वात मोठी व्यवहारातील घसरण राखली.
अर्थसंकल्प जारी होताच भांडवली बाजारात उतरण लागली. यामध्ये रेल्वेशी संबंधित समभागही घसरू लागले. त्यांच्यात ८ टक्क्यांपर्यंतची आपटी या वेळी नोंदली जात होती. दिवसभरात ते २० टक्क्यांपर्यंत आपटले. रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत प्रकल्पांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा उल्लेख होऊनही समभागांना भाव मिळाला नाही.
भांडवली बाजाराने गेल्या दोन्ही व्यवहारांत तेजी नोंदविली आहे. असे करताना सेन्सेक्स २६ हजारांवर पोहोचला होता. तर निफ्टीने ७,८००ची नोंद केली होती. हे दोन्ही स्तर मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्पामुळे मागे फिरले. रेल्वे अर्थसंकल्पात माहिती तंत्रज्ञान, खासगी क्षेत्राला वाव, मालवाहतुकीवर भर असे असूनही हे घडले.
मुख्य अर्थसंकल्पाला दिशा मिळेल, असे काहीही रेल्वे अर्थसंकल्पात नसल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदारांनी निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवून केल्याची प्रतिक्रिया बाजार विश्लेषकांनी दिली आहे. त्यामुळेच ऐतिहासिक टप्प्यावर असलेल्या बाजाराचा लाभ पदरात पाडून घेण्याच्या हेतूने गुंतवणूकदारांनी नफेखोरी अवलंबली असावी, असा अंदाजही बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला. बाजार आता गुरुवारच्या मुख्य अर्थसंकल्पाकडे डोळे लावून आहे.
सेन्सेक्समध्ये यापूर्वी ३ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वाधिक ६५१ अंशांची घसरण नोंदली गेली होती. सेन्सेक्समधील केवळ दोनच समभाग तेजीत राहिले. उर्वरित सर्व २८ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये भेल, एनटीपीसीसारख्यांची आपटी तर ८ टक्क्यांपर्यंतची होती.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बांधकाम हा सर्वाधिक, ७.१६ टक्क्यांसह आपटला. सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. स्मॉल व मिड कॅममध्येही विक्रीचा दबाव दिसून आला.

– रेल्वे अर्थसंकल्प – उद्योगक्षेत्राच्या प्रतिक्रिया
रेल्वे संपत्तीला खासगीकरणाद्वारे प्रोत्साहन
* गेल्या अनेक दशकांपासून चीन, जपान जे रेल्वे क्षेत्रात करत आहेत ते आता आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, हेच यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. वाहतूक सुधारण्याच्या हेतूने उचलण्यात आलेली पावले निश्चितच व्यवसायातील खर्च कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील आणि त्यामुळे परिणामत: देशाच्या उत्पादकतेला पुरेशा प्रमाणात वाव मिळेल. जागा आदी रेल्वेकडे मोठय़ा प्रमाणात असलेल्या संपत्तीसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी, थेट विदेशी गुंतवणूक आदींद्वारे प्रोत्साहन देण्यात आले आहे.
*  राणा कपूर, अध्यक्ष, असोचेम

नाममुद्रा असलेल्या तयार खाद्यपदार्थामुळे जागरूकता
* भारतीय रेल्वेशी संबंधित सर्व स्थानके, विक्री दालनांमध्ये तयार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याची यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाची घोषणा ही खूपच प्रोत्साहनवर्धक आहे. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्याने अशा नाममुद्रा असलेल्या उत्पादनांबद्दल अधिक जागरूकता येईल. यामुळे केवळ चांगली गुणवत्ताच मिळणार नाही तर अन्नपदार्थाचे नुकसानही कमी होईल. फक्त खाद्यपुरवठा यंत्रणा सुटसुटीत होणे गरजेचे आहे. तसेच अशा प्रसिद्ध कंपन्यांच्या खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्वच्छताही उपलब्ध होणे गरजेचे आहे.
*   साहिल गिलानी, संचालक (विक्री व विपणन), गिट्स फूड प्रॉडक्ट्स

रेल्वे मालवाहतूक मार्ग उल्लेखनीय प्रकल्प
* पायाभूत सेवा अद्ययावत करण्यासाठी तसेच परिचलन परिणामकता सुधारणेसाठी खूप कार्य करण्याची गरज होती. मला वाटते यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाद्वारे ही काळाजी गरज ओळखली गेली आहे. आणि त्यातून दूर दृष्टिकोनही प्रतििबबित झाला आहे. जगातील एक मोठा मालवाहतूक प्रकल्प रेल्वे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून साकार होत आहे, हेही आनंददायी आहे. प्रकल्पांची अंमलबजावणी आणि महसुली उत्पन्नवाढीचे आव्हान समोर असताना त्यातून काहीसा मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला आहे.
* अजय श्रीराम, अध्यक्ष, सीआयआय

बायो-डिझेलच्या वापरामुळे १४२.५० कोटी रुपये वाचतील
* बायो-डिझेलला रेल्वे क्षेत्राशी जोडून यंदाच्या अर्थसंकल्पाने स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. रेल्वेला लागणाऱ्या एकूण इंधनापैकी ५ टक्के इंधन हे बायो-डिझेलच्या स्वरूपात असेल, असे या रेल्वे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने गेल्या वर्षभरात इंधनावर २८,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. नव्या पर्यायामुळे ५ टक्के पर्यायामुळे सरकारचे १४२.५० कोटी रुपये वाचणार आहेत.
* संतोष वर्मा, संचालक, माय इको एनर्जी

खासगीकरणाला वाव स्वागतार्ह

* भविष्याला दिशा देणारा यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प आहे. आदर्शवत चेहरा यातून दिसून येतो. स्वच्छता, खानपान सेवा, तयार खाद्यपदार्थ तसेच उच्च श्रेणीच्या रेल्वेमधून वाय-फाय सुविधा या सर्व अद्ययावत उपाययोजना आहेत. रेल्वेमध्ये प्राथमिक टप्प्यात खासगीकरणाला देण्यात येत असलेला वाव स्वागतार्हच आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून खासगीकरणाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग हेही उल्लेखनीयच म्हणावे लागेल.
*   विवेक आर्य,
व्यवस्थापकीय संचालक, ऱ्हिनस लॉजिस्टिक्स