अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हने अर्थउभारीच्या कार्यक्रमात चालू वर्षअखेरपासून माघार घेण्याच्या केलेल्या घोषणेचे अपेक्षेप्रमाणे भांडवली बाजारात भयंकर विपरीत पडसाद गुरुवारी दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक – सेन्सेक्सने दोन वर्षांतील सर्वात मोठी म्हणजे ५२६ अंशांची (पावणे तीन टक्के)गटांगळी दाखविली, तर चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने नांगी टाकताना ५९.९३ असा तळ गाठला. वस्तू वायदे बाजारात सोने-चांदी या मौल्यवान धातूंमध्ये अनुक्रमे ३.५% आणि ६ % घसरणीची प्रतिक्रिया दिली. रोखे बाजारात विदेशी गुंतवणुकीच्या आकस्मिक मोठय़ा पलायनाने, घसरणीचे खालचे सर्किट गाठले गेल्याने या बाजारातील व्यवहारांना काही काळ अपरिहार्यपणे टाळे लावणे भाग पडले.
एकाच दिवसात निर्देशांकात जवळपास सव्वा पाचशे अंशांची घसरण नोंदविणाऱ्या शेअर बाजारात गुरुवारी गुंतवणूकदारांच्या खिशाला जबर झळ बसली. प्रत्येक १० समभागांमागे ७ समभागांचे भाव घसरले इतकेच नाही ते वर्षांच्या नीचांकाला येऊन पोहचले. या पडझडीत गुंतवणूकदारांच्या ६३.२१ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेवर फुंकर मारली गेली, तर एकूण बाजारमूल्य १.५५ लाख कोटींनी रोडावले.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक- सेन्सेक्सने जवळपास दोन वर्षांत प्रथमच एकाच दिवसात सर्वात मोठी आपटी गुरुवारी घेतली. ५२६.४१ अंश घसरणीसह सेन्सेक्स १८,७१९.२९ पर्यंत खाली आला, तर १६६.३५ अंश नुकसानासह ५,७०० च्याही खाली येत ५,६५५.९० पर्यंत स्थिरावला. गेल्या दोन महिन्यांची नीचांकीला आलेले दोन्ही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे २.१७४ व २.८६ टक्क्यांनी घसरले होते. तर एमसीएक्स-एसएक्सचा एसएक्स ४० निर्देशांकही तब्बल ३०८.२२ अंश घटीसह (२.७० टक्के) ११,११८.८५ वर बंद झाला.
दुपारच्या सत्रापूर्वीच सेन्सेन्सने ४२३ अंशांची घट घेत १९ हजाराचीही पातळी सोडली. याच वेळी निफ्टीही ५,७०० च्या खाली आला होता. दरम्यान डॉलरच्या तुलनेत ढासळत्या रुपयानेही ऐतिहासिक नीचांकीचे पडसाद बाजारावर अधिक तीव्र केले.
दिवसअखेर सेन्सेक्सने सप्टेंबर २०११ नंतरची एकाच सत्रातील सर्वात मोठी आपटी नोंदविली. यापूर्वी मुंबई निर्देशांक एकाच व्यवहारात ७०४ अंशांने कोसळला होता. तर निफ्टीनेही गुरुवारी ५,७०० ची पातळी सोडली. दोन्ही निर्देशांक त्यांच्या गेल्या दोन महिन्यांच्या तळाला विसावले आहेत.
पोलाद निर्देशांकातील जिंदाल, टाटा स्टील, हिंदाल्कोसारख्या कंपन्यांचे समभाग १० टक्क्यांपर्यंत घसरले होते. सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २८ समभागांचे मूल्य खालावले. तर सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकही घसरले. बांधकाम निर्देशांकाला सर्वाधिक, ५.१८ टक्क्यांचा फटका बसला. एकाच सत्रातील मोठय़ा घसरणीपोटी गुंतवणूकदारांची मालमत्ताही दीड लाख कोटी रुपयांनी कमी झाली.
आशियाई बाजारात चीन, हाँककाँग, जपान, सिंगापूर, तैवान, दक्षिण कोरिया येथील शेअर बाजारही १.३५ ते २.८८ टक्क्यांपर्यंत घसरले होते. तर युरो झोनमधील फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनचे भांडवली बाजारही २ टक्क्यांपेक्षा कमीचा प्रवास करत होते.

सरकारकडून सत्वर दिलासा  अन् हस्तक्षेपाची ग्वाही
देशाचे मुख्य अर्थ-सल्लागार रघुराम राजन यांनी रुपयातील अस्थिरतेत हस्तक्षेप करण्याची ग्वाही दिल्याने अखेर चलन बाजारात गुरुवारी व्यवहाराअंती ६० च्या आत विसावले. चलनातील अस्थिरता रोखण्यासाठी सरकार निर्णायक पावले उचलले आणि रुपयातील घसरण थोपविण्यासाठीचे उपाय हे निश्चितच अल्पकालीन नसतील, असेही त्यांनी सांगतिले. रुपयातील घसरणीने आयात महाग होऊन चालू खात्यातील तुटीवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून सोन्यावर अधिक र्निबध आणण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनीही रुपयातील अस्थिरता रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेला पुरेसे अधिकार असून मध्यवर्ती नियामक संस्था त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा त्यात हस्तक्षेप करेल, असे स्पष्ट केले.

मौल्यवान घसरण!
फेड धोरण संकेताने जागतिक बाजारात गुरुवारी अनेक जिनसांसह मौल्यवान धातूंच्या किमतीही कमालीच्या रोडावल्या. सोने-चांदीसाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या लंडनमध्ये धातूंचे दर केवळ ६ टक्क्यांपर्यंतच आपटले नाहीत, तर त्यांनी गेल्या अडीच वर्षांची नीचांकी गाठली. प्रती औन्स ४.५ टक्के घसरणीनंतर १२८५.९० डॉलरवर राहताना सोने सप्टेंबर २०१० नंतर खालावले आहे, तर चांदीच्या दरातही ६ टक्क्यांपर्यंतची घट नोंदली गेली. धातूंमध्ये सर्वाधिक आपटी घेत चांदी प्रती औन्स १९.६८ डॉलरवर राहिली.
भारतातही गुंतवणूकदारांनी चढय़ा दराने मौल्यवान धातूंपासून फारकत घेणारी विक्री केली. मुंबई शहरात सोने १० ग्रॅममागे एकाच दिवसात ७६५ रुपयांनी कमी होऊन ते २७,१६० रुपयांवर आले. तर चांदीच्या किलोच्या भावातही १९३५ रुपयांची घसरण नोंदविली जाऊन ते ४५,०५० रुपयांवरून थेट ४३,११५ रुपयांवर आले.

आघाडीच्या ६७ समभागांचे नीचांकपद!
वर्षांतील नीचांकपदाला पोहचलेल्या ‘बीएसई ५०० निर्देशांका’मधील आघाडीच्या ६७ समभागांची आजच्या सत्रात नव्याने भर पडली. त्यातील काही प्रमुख नावांची सूची:

तज्ज्ञांचे बोल..
क्यूई३ अंतर्गत सुरू असलेली फेडची दरमहा रोखे खरेदी डिसेंबर २०१३ पर्यंत तरी कायम राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याच्या बर्नान्के यांच्या वक्तव्याने १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचा परतावा १.४४ टक्क्यांवर आहे. गव्हर्नर म्हणतात त्याप्रमाणे क्यूई कार्यक्रमाचा अकाली शेवट डिसेंबपर्यंत झाला तर एकूण जागतिक रोखतेचे प्रमाणही १५ ते २० टक्क्यांनी वाढेल.
’ सुनंदन चौधरी
मुख्य अर्थतज्ज्ञ, आयसीआयसीआय बँक.