सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने शुक्रवारी गेल्या दोन आठवडय़ांतील नीचांक गाठला. २२३.९४ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,४४२.१० तर १००.७० अंश घसरणीसह निफ्टी ८,६०६.०० वर थांबला.
चालू आठवडय़ातील गेल्या तीन व्यवहारांत सेन्सेक्स ६०२.३४ अंशांनी खाली आला आहे. त्यामुळे मुंबई निर्देशांकाचा २९ हजाराचा टप्पाही मागे पडला. आठवडय़ाच्या सुरुवातीला त्याने हा स्तर गाठला होता. सप्ताहअखेरच्या व्यवहारात सेन्सेक्सने २८,५०० चा टप्पाही सोडला.
२८,६८२.९७ अशी वाढीसह सप्ताहाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक व्यवहारात २८,६९६ पर्यंतच पोहोचू शकला. बाजारातील व्यवहारानंतर जाहीर होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या आर्थिक निकालाच्या पाश्र्वभूमीवर कंपनीचा समभाग अवघ्या ०.०६ टक्क्याने खाली आला.
सप्ताहाअखेरच्या व्यवहारात टीसीएस, सन फार्मासारख्या समभागांच्या विक्रीचा दबाव अनुभवला गेला. अपेक्षेपेक्षा कमी फायद्यातील निष्कर्ष जाहीर करूनही टाटा समूहातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. त्याच्यासह सन फार्मा ४.८० टक्क्यांपर्यंत घसरला.
सेन्सेक्समधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, इन्फोसिससह; वाहन क्षेत्रातील बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प; बँक क्षेत्रातील अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक त्याचबरोबर गेल, भारती एअरटेल यांचे समभाग घसरले. तर टाटा स्टील, सेसा स्टरलाईट, हिंदाल्को या पोलाद क्षेत्रातील तर भेल, एनटीपीसी, टाटा पॉवर, युनिलिव्हर या समभाग वधारले.