मुंबई शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या १९८.४५ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २५,८९४.९७ पर्यंत खाली आला. या जवळपास द्विशतकी नुकसानीने बाजाराने २० दिवसातील सर्वात मोठी आपटी जुलै महिन्यातील सौदापूर्तीच्या दिवशी नोंदविली. निफ्टीतही ७०.१० अंश घसरण होत हा निर्देशांक ७,७२१.३० या दीड आठवडय़ाच्या नीचांकावर येऊन ठेपला.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निधी काढून घेण्याचा ओघ कायम ठेवल्यानंतर बँक, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये विक्री झाली. यापूर्वी प्रमुख कंपन्यांच्या नफ्यातील निकालांना प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकीच्या वधारत्या नफ्यांकडेही गुरुवारी दुर्लक्ष केले.
शेअर बाजारातील गुरुवारची घसरण ही ११ जुलैनंतरची सर्वात मोठी घसरण ठरली. या दिवशी सेन्सेक्स तब्बल ३४८.४० अंशांनी कोसळला होता, तर निफ्टीनेही ११ जुलैच्या १०८.१५ या एकाच दिवसातील घसरणीनंतरची मोठी आपटी आज दाखविली. सेन्सेक्समधील एचडीएफसी, आयटीसी, टाटा मोटर्स, महिंद्र, टीसीएस, विप्रो, भेल हे समभाग पडले.