08 April 2020

News Flash

दिवाळीची फटाकेबाजी सार्वकालिक उच्चांकाला

मुंबई शेअर बाजाराच्या दलाल स्ट्रीटने दोन दिवस आधीच बुधवारी दिवाळी उत्सवी उत्साह अनुभवला. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित निराशा झाली असली

| October 31, 2013 12:19 pm

मुंबई शेअर बाजाराच्या दलाल स्ट्रीटने दोन दिवस आधीच बुधवारी दिवाळी उत्सवी उत्साह अनुभवला. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित निराशा झाली असली तरी अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हच्या आगामी दोन दिवस चालणाऱ्या बैठकीची फलश्रुती मात्र स्थानिक बाजारासाठी उपकारक ठरेल असे कयास बांधत, मुख्य निर्देशांक- सेन्सेक्सने २१,०३३.९७ अशा सार्वकालिक उच्चांकी वेस बुधवारी ओलांडली.
जगातील सर्वच प्रमुख बाजारांमध्ये फेडरल रिझव्‍‌र्हच्या दोन दिवसांच्या बैठकीतून द्रवतेला पूरक ठरणारा कौल येईल अशा आशेने बुधवारी तेजी दाखविली. त्याला पूरकता म्हणून स्थानिक बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीत उत्साह कायम राखला. परिणामी अर्थव्यवस्थेतील रोकडवाढीला बळ देणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या दुसऱ्या तिमाही पतधोरण आढाव्यातील उपाययोजनांबाबत सकारात्मकता दाखवीत मंगळवारच्या सेन्सेक्सच्या ३५९ अंशांच्या सुसाट तेजीने आज शतकी वाढीसह आणखी पुढची पायरी गाठली. महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्याने फ्युचर्स आणि ऑप्शन व्यवहारांच्या सौदापूर्तीचा उद्याचा दिवस पाहता गुंतवणूकदारांच्या ‘शॉर्ट कव्हरिंग’ पवित्र्यानेही तेजीत योगदान दिले. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीनेही ३०.८० अंशांच्या वाढीसह ६,२५१.७० असा महत्त्वाचा टप्प्यावर दिवसअखेर विश्राम घेतला. बाजारात उत्साही वातावरण इतके बिनतोड होते की, घसघशीत तिमाही तोटा नोंदविणारा भारती एअरटेलचा समभाग हा सेन्सेक्समधील सर्वाधिक ६ टक्क्यांची वाढ दाखविणारा समभाग ठरला. आयटीसी आणि आयसीआयसीआय बँक या समभागांच्या भावांनी घेतलेली झेपही सेन्सेक्सला बळ देणारी ठरली. १३ क्षेत्रीय निर्देशांकापैकी ११ मध्ये उत्साही वाढ दिसली.

दिवाळीचा नूर.. तीन वर्षांनंतर!
यापूर्वी ५ नोव्हेंबर २०१० रोजी म्हणजे ऐन दिवाळीत सेन्सेक्स सर्वप्रथम २१ हजारापार २१,००४.९६ अंशांवर स्थिरावला होता. २०११ चा अपवाद करता मधली दोन वर्षे खडतर गेल्यानंतर आता तीन वर्षांनी खऱ्या अर्थाने शेअर बाजारातील गुंतवणूकदार दिवाळी अनुभवत आहे. सेन्सेक्सचा दिवसांतर्गत व्यवहारातील उच्चांकी स्तर २१,२०६.७७ असा १० जानेवारी २००८ रोजी नोंदला गेला आहे. या शिखरापासूनही तो आता केवळ १८४ अंश दूर आहे.

उच्चांकी झेप सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या सहभागाविनाच!
गेली अडीच वर्षे बाजारातील वादळी वध-घटीने चांगलेच हात पोळल्याने हिरमोड झालेल्या छोटय़ा गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे फिरविलेली पाठ स्पष्टपणे दिसत आहे. हे गुंतवणूकदार सहभागी असते तर दलाल स्ट्रीटवरील सणोत्सवातील उत्साह द्विगुणितच झाला असता असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. सेन्सेक्सच्या उच्चांकी झेपेला गुंतवणूकदारांच्या व्यापक सहभागाची सखोलता नसल्याकडे लक्ष वेधताना, हा सहभाग असता तर आज निर्देशांक खूप मोठय़ा उंचीवर दिसला असता, असे प्रतिपादन एंजल ब्रोकिंगचे राजन शाह यांनी व्यक्त केला. तथापि, यापुढे बाजारातील प्रत्येक घसरण ही खरेदीची संधी म्हणून पाहिली जायला हवी. आगामी २-३ वर्षांत सेन्सेक्सने ३० हजारांच्या पातळीला गवसणी घातलेली दिसेल, असा आशावादही शाह यांनी व्यक्त केला. हेच सूत्र पकडत तांत्रिक विश्लेषक सुदर्शन सुखानी यांनी, आजवरच्या तेजीपासून अलिप्त राहिलेल्या तगडय़ा मिड आणि स्मॉल-कॅप समभाग आता उसळी घेताना दिसतील, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2013 12:19 pm

Web Title: bse sensex record bse sensex closes at all time high of 21033 97
Next Stories
1 रुपया प्रतिडॉलर ६१.२३
2 रिझव्‍‌र्ह बँकेचे महागाईकेंद्रित पतधोरण
3 पतधोरणाने भांडवली बाजाराला ऊर्जा
Just Now!
X