सकाळपासून सावधपणे वाटचाल करणाऱ्या शेअर बाजारातील निर्देशांकांनी गुरुवारी मध्यान्हीला युरोपीय बाजारांचा दमदार कल पाहता, उत्तरार्धाच्या अध्र्या तासात जोमदार मुसंडी मारली. मुंबई शेअर निर्देशांक सेन्सेक्सने त्यापायी महिनाभरात पुन्हा फिरून १९ हजाराची सीमा ओलांडली.
या आधी चालू महिन्यात २ एप्रिलला सेन्सेक्सने १९ हजाराच्या पातळीला भोज्या करून सलग घसरणीचा क्रम सुरू केला होता. आज बाजारात झालेल्या व्यवहारात दिवसअखेर सेन्सेक्सने कालच्या तुलनेत २८५ (१.५२%) अंशांची तर निफ्टी निर्देशांकाने ९४.४० (१.६६%) अंशांची भरीव कमाई केली. माहिती-तंत्रज्ञान वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वर होते. रोखे बाजारात १० वर्षांचा परतावा जुलै २०१०च्या पातळीवर ७.७६% इतका घसरल्याने व्याजदर संवेदनशील समभागांमध्ये मोठी खरेदी दिसून आली. बँकिंग (२.४९%), भांडवली वस्तू (२.६३%), ग्राहकोपयोगी वस्तू (२.९९%), वाहने (२.२६%) या निर्देशांकांनी सेन्सेक्सच्या वाढीला हातभार लावला. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांनी गुरुवारच्या सत्रात चमक दाखविली.