सलग चौथ्या सत्रातही निर्देशांकाने तेजी नोंदविल्याने भांडवली बाजारांनी सप्ताहअखेर त्यांचा अनोखा टप्पा पुन्हा गाठला. एकाच व्यवहारात जवळपास ३०० अंशांच्या झेपेने सेन्सेक्स २९ हजारावर सर झाला, तर शतकी अंश इतक्याने निफ्टी उंचावत ८,८०० च्या पल्याड पोहोचला.
२८९.८३ अंश वाढीने मुंबई निर्देशांक २९,०९४.९३ वर बंद झाला. ९३.९५ अंश भर घातल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ८,८०.५० पर्यंत मजल मारली. तब्बल दहा दिवसानंतर मुंबई निर्देशांकाला २९ हजाराचा पल्ला गाठता आला आहे.e07नजीक येऊन ठेपलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अधिक आर्थिक सुधारणा राबविली जाण्याची आशाही बाजारातील व्यवहारात दिसून आली. त्याचबरोबर ताज्या महागाई व औद्योगिक उत्पादन दराद्वारे अर्थव्यवस्थेचे सुमार प्रदर्शन झाल्याने रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत व्याजदर कपातीची अपेक्षाही गुंतवणूकदारांनी व्यक्त केलेली दिसली. युरोपातील भांडवली बाजारातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम येथेही जाणवला.
बाजारात शुक्रवारी भरघोस नफ्याचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या स्टेट बँकेसह एकूण बँक निर्देशांकही वरचढ ठरला. गेल्या तिमाही नफ्यात ३० टक्के वाढ नोंदविल्यानंतर लगेच बँकेचा समभागच ८ टक्क्य़ांपर्यंत वाढला. २९ हजारावर राहण्यासाठी सेन्सेक्समधील २४ समभागांनीही साथ दिली.
महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, टीसीएस, कोल इंडिया, आयटीसी, मारुती सुझुकी, सन फार्मा, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल यांचा मूल्य वाढीमध्ये समावेश राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.३२ टक्के वाढीसह बँक निर्देशांक आघाडीवर राहिला. स्मॉल व मिड कॅप निर्देशांक पाऊण टक्क्य़ांच्या वर उंचावले.
सेन्सेक्समधील गेल्या सलग चार व्यवहारातील तेजी ८६७.५४ अंश राहिली आहे. २९ हजारपल्याड शुक्रवारचा त्याचा प्रवास २९,१५४.६७ पर्यंत झेपावला. निफ्टीही सत्रात ८,८२२.१० पर्यंत उंचावला.

जागतिक भांडवली बाजारातील तेजी, भारतातील अर्थसंकल्पाबाबत सकारात्मक अपेक्षा आणि स्टेट बँक, महिंद्र यांच्याकडून जाहीर झालेले अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही वित्तीय निकाल हे शेअर बाजाराला शुक्रवारी अनोख्या टप्प्यावर घेऊन जाण्यास चालना देणारे ठरले.
-दीपेन शहा, खासगी ग्राहक समूह संशोधन, कोटक सिक्युरिटीज