निरंतर तेजीने आघाडीच्या कंपन्यांना आलेला  चांगला भाव पाहता, मंगळवारी गुंतवणूकदारांनी वरच्या भावावर नफेखोरी साधत बाजाराला घसरण नोंदविण्यास भाग पाडले. सेन्सेक्स ५४.५३ अंश घसरणीसह २७,२६५.३२ वर तर निफ्टी २०.९५ अंश नुकसानासह ८,१५२.९५ पर्यंत खाली आला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सोमवारी नव्या विक्रमासह सप्ताहारंभ नोंदविला होता.
सोमवारी सेन्सेक्स व्यवहारात २७,३५४.९९ पर्यंत गेल्यानंतर २७,३१९.८५वर बंद झाला होता. त्याचे हे अनुक्रमे सत्रातील व बंदअखेरचे विक्रम होते. तर निफ्टी या सत्रात ८,१८०.२०पर्यंत व बंदअखेर ८,१७३.९०पर्यंत गेला होता. दोन्ही निर्देशांकांनी इतिहासात प्रथमच हा टप्पा गाठला होता. मंगळवारी सेन्सेक्स सत्रात २७,३२८.२७ पर्यंत तर निफ्टी ८,१७३.९० पर्यंत गेले होते.
मंगळवारी नफेखोरीच्या व्यवहारात आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एल अ‍ॅन्ड टी, ओएनजीसी, भेल, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग मूल्य घसरले. तर सिप्ला, कोल इंडिया, गेल, टाटा मोटर्स, आयटीसी, महिंद्र, टाटा पॉवर, टाटा स्टील, स्टेट बँक, भारती एअरटेल यांचे समभाग वधारले. सेन्सेक्समधील १६ समभाग आपटले. एकूण बाजारात मंगळवारी घसरण नोंदली गेली असली तरी मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये खरेदी दिसून आली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचा हा परिणाम होता. तर बांधकाम निर्देशांकाने १.१ टक्क्यासह सर्वाधिक घसरण नोंदविली.

रुपयाची महिन्यातील सर्वोच्च आपटी
मुंबई : एकाच व्यवहारात तब्बल ३१ पैशांनी रोडावत भारतीय रुपयाने मंगळवारी  महिन्याभरातील सर्वोच्च आपटी नोंदविली. स्थानिक चलन मंगळवारी ०.५१ टक्क्यांनी घसरले. डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी वधारत चलनाने मंगळवारी व्यवहारास प्रारंभ केला. यानंतर मात्र त्यात घसरण सुरू झाली आणि ६०.६६ नीचांकापर्यंत गेली. दिवसअखेर रुपया सोमवारच्या तुलनेत ३१ पैशांनी घसरत ६०.६०पर्यंत खाली आला. रुपयाने यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी सत्रातील सर्वाधिक, ६५ पैशांची घसरण नोंदविली होती. तर २ सप्टेंबर रोजी ६०.६८ या पातळीवर नोंदविलेल्या आठवडय़ातील सर्वात किमान स्तरापासून चलन आता काही अंतरावरच आहे. महत्त्वाच्या चलनांच्या तुलनेत डॉलर मात्र गेल्या १६ महिन्यांच्या उच्चांकावर प्रवास करत आहे. रुपया नव्या आठवडय़ाचा प्रारंभ करताना सोमवारी १० पैशांनी भक्कम होत ६०.२९ पर्यंत उंचावला होता. हा त्याचा गेल्या दिड महिन्यातील सर्वोच्च टप्पा होता. तत्पूर्वी गेल्या आठवडय़ातही त्याची दोन व्यवहारांत ५५ पैशांची वाढ राहिली आहे.