४२९ अंशांची झेप घेत ‘सेन्सेक्स’ ४१ हजारापुढे

मुंबई : जवळपास २,००० जणांचा बळी घेणाऱ्या चीनमधील करोनाग्रस्त नवीन रुग्णांची संख्या रोडावणे आणि आजारसाथीची बाधा झालेल्या भारतातील उद्योगाला सरकारकडून साहाय्य मिळण्याची शक्यता या दिलाशाने भांडवली बाजारातील गेल्या सलग चार व्यवहारांतील घसरणीला बुधवारी पायबंद घातला गेला.

बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात एक टक्क्याहून अधिक वाढ नोंदविली. परिणामी, सेन्सेक्स व निफ्टी त्यांच्या अनुक्रमे ४१ हजार व १२ हजारांच्या पातळ्यांपुढे पुन्हा गेले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स थेट ४२८.६२ अंशांनी झेपावत ४१,३२३ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३३.४० अंशांनी उंचावत १२,१२५.९० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक, २.६० टक्क्यांपर्यंत वाढला. तसेच बजाज फायनान्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, ओएनजीसी, एचडीएफसी लिमिटेड आदी २.७९ टक्क्यांनी वाढले. तर सन फार्मा, टीसीएस, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक आदी मात्र १.३३ टक्क्यांपर्यंत घसरले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी करोनाग्रस्त क्षेत्राच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्यामुळे देशातील औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, रसायन, विद्युत उपकरण, माहिती तंत्रज्ञान, सौरऊर्जा, वाहन, आरोग्य आदी क्षेत्रांसाठी सरकारकडून आर्थिक सहकार्य तसेच सूट-सवलती जाहीर होण्याबाबतची आशा निर्माण झाली. परिणामी गुंतवणूकदारांनी बुधवारी समभाग खरेदीचा सपाटा लावला.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील परकीय चलन विनिमय बाजार बंद होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा प्रति पिंप ५८ डॉलपर्यंतची उसळी घेतली.

सर्वव्यापी खरेदी..

मुंबई शेअर बाजारातील सर्व, १९ क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या क्रमवारीत राहिले, तर देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांकांमध्ये प्रमुख निर्देशांकांपेक्षा अधिक, अनुक्रमे १.४१ व १.३४ टक्के वाढ झाली.