आठवडय़ाच्या उच्चांकाला पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे सेन्सेक्सला मंगळवारी शतकी (१०२.५९ अंश) घसरणीला सामोरे नेले. अमेरिकेतील फेडरल रिझव्र्हच्या सुरू होत असलेल्या बैठकीवर नजर ठेवत नफेखोरांनी व्याजदराशी निगडित बँक समभागांची विक्री केल्याने मुंबई निर्देशांक १९,२२३.२८ पर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६.४५ अंश घसरणीसह ५,८१३.६० वर राहिला आहे.
मंगळवारच्या शतकी घसरणीने गेल्या दोन दिवसांची तेजी रोखली गेली. या दोन सत्रातील जवळपास ५०० अंशांच्या वाढीने सेन्सेक्स गेल्या आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर होता. १९,३२९ अशी स्थिर सुरुवात करणारा सेन्सेक्स दिवसभर बहुतांश काळ सकारात्मक राहिला. दुपारनंतर मात्र तो १९,१९१ नीचांकापर्यंत खाली आला.
अमेरिकन अर्थव्यवस्था सुधारणेच्या वाटेवर असल्याने फेडचे गव्हर्नर बेन बर्नान्के हे सुमारे ८५ अब्ज डॉलरच्या मासिक रोखे खरेदीच्या निर्णयाबाबत साशंकतेमुळे गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात गेल्या दोन दिवसाच्या वरच्या पातळीवर गेलेल्या समभागांची विक्री केली. अमेरिकेतील बैठक दोन दिवस चालणार असून त्या धर्तीवरच भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सोमवारच्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदर कपात लांबणीवर टाकणारा सावध पवित्रा घेतला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2013 12:07 pm