रिझव्र्ह बँकेच्या सोने आयातीवरील र्निबध विस्तारण्याच्या निर्णयाचे भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी स्वागत केले. परिणामी सेन्सेक्सला १४३.०१ अंश वाढीसह २०,३०२.१३ या गेल्या ३० महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर नेऊन ठेवले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील मंगळवारी ४६ अंश वाढून ६,०७७.८० वर पोहोचला.
चालू खात्यातील तूट रोखण्यासाठी सोने आयातीला र्निबध म्हणून रिझव्र्ह बँकेने सोमवारी उशिरा बँकांना आयात केलेल्या एकूण सोन्यापैकी २० टक्के हिस्सा (दागिने निर्मात्या) निर्यातदारांसाठी राखून ठेवण्याच्या पावलाचे भांडवली बाजाराने सुरुवातीपासूनच स्वागत केले. त्यातच अमेरिकेतील गृहविक्री आकडेवारी निराशाजनक आल्याने फेडरल रिझव्र्हच्या आर्थिक उपाययोजना कायम राहण्याच्या आशेने विदेशी गुंतवणूकदारांनी येथील निधीचा ओघ राखून ठेवला. यामुळे सेन्सेक्सने ४ जानेवारी २०११ नंतरचा, २०,४८९.७२ चा टप्पा गाठला. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांची मालमत्ता ४०,००० कोटी रुपयांनी वधारली.
आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक, महिंद्र अॅन्ड महिंद्र, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज्, भेल असे आघाडीच्या समभागांचे मूल्य वधारले होते. आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागाने तर वर्षभरातील उच्चांक मंगळवारच्या व्यवहारात गाठला. सर्वच क्षेत्रीय निर्देशांक ३.८५ टक्क्यांची वाढ नोंदवीत होते. सेन्सेक्समधील २१ समभाग तेजीच्या यादीत राहिले.

चांदी ४२ हजार पार!
मुंबई: सराफा बाजारातील तेजी सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिली. सोन्यासाठी तोळ्याचा भाव मंगळवारी ३९५ रुपयांनी वधारत रु. २७,७२० वर गेला. तर मंगळवारी किलोमागे ५६५ रुपयांची भर पडत चांदी थेट ४२,४५० रुपयांवर गेली आहे. कालच्या व्यवहारात ते एकदम १,००० रुपयांनी वाढून महिन्याच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले होते.